कामठी (नागपूर) : तांत्रिक कारणांमुळे शवागरातील फ्रिझर बंद पडल्याने मृतदेहाला दुर्गंधी यायला सुरुवात झाली. हा प्रकार लक्षात येताच मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय व तालुका प्रशासनाच्या विराेधात संताप व्यक्त करीत नारेबाजी केल्याने तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. हा प्रकार मंगळवारी (दि. १४) सकाळी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला.
लिहिगाव (ता. कामठी) येथील प्रकाश किशन मेश्राम (वय ५९) यांनी साेमवारी आत्महत्या केल्याने त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणला हाेता. उत्तरीय तपासणी प्रक्रिया मंगळवारी करायची असल्याने मृतदेह शवागरातील फ्रिझरमध्ये ठेवला हाेता. मध्यरात्री फ्रिझरमध्ये अचानक बिघाड निर्माण झाल्याने ते बंद पडले. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याचे लक्षात येताच मृताच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.
त्यातच मंगळवारी सकाळी अपघातातील मृत कृष्णराव आरेकर (रा. येरखेडा, ता. कामठी) यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणला. त्यामुळे शवागराजवळील नागरिकांच्या संख्येत भर पडली असताना मृत प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबीयांसह इतरांनी रुग्णालय व तालुका प्रशासनाच्या विराेधात नारेबाजी करायला सुरुवात केली. पाेलिस अधिकारी व काही सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घेत संतप्त कुटुंबीयांसह नागरिकांना समजावून सांगत शांत केले. त्यामुळे तणाव निवळला. यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती मृताच्या कृटुंबीयांनी दिली. दुसरीकडे, फ्रिझर लवकरच दुरुस्त केला जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.