लाेकमत न्यूज नेटवर्क
गाेंडखैरी : वेगात असलेल्या टॅँकरने समाेर असलेल्या ट्रकला मागून जाेरात धडक दिली. त्यात टॅँकर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी (ता. कळमेश्वर) परिसरात मंगळवारी (दि. २) पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
सुरेंद्र धनजू यादव (३७, रा. निजामवत-सिलवासा, जिल्हा आजमगड, उत्तर प्रदेश) असे जखमी टँकर चालकाचे नाव आहे. तो गुजरातमधून डीएन-०९/व्ही-९८६९ क्रमांकाच्या ट्रॅँकरमध्ये डिझेल घेऊन अमरावती, नागपूर मार्गे कोराडी (ता. कामठी) येथे जात हाेता. दरम्यान, गोंडखैरी परिसरात चालकाचा ताबा सुटला आणि हा टॅँकर समाेर असलेल्या केए-२६/६३९० क्रमांकाच्या ट्रकवर मागून आदळला. धडक एवढी जबर हाेती की, त्यात टँकरच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला.
आवाज ऐकायला येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी टँकरच्या केबिनमध्ये फसलेल्या सुरेंद्रला अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला वैद्यकीय अधिकारी डाॅ. रौनक भोळे यांंच्या सूचनेवरून नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था करण्यात आली. माहिती मिळतात सहायक फाैजदार दिलीप सपाटे व हेडकाँन्स्टेबल प्रकाश उईके यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.