नागपूर : फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनेन यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. नागपुरातील विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी ते आले असताना त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत बोलण्यास संघ पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. लीनेन यांच्यासह कौन्सिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई सोनिया बार्ब्री यादेखील होत्या.
मागील काही वर्षांत संघ मुख्यालयात अनेक देशाच्या उच्चायुक्तांनी भेट दिली आहे. सिंगापूरचे तत्कालीन उप उच्चायुक्त जोनाथन टो हे संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय ब्रिटिश दूतावासाचे कौन्सिलर किरेन ड्रेक, जर्मनीचे राजदूत वॉल्टर लिंडनर यांनीदेखील संघ मुख्यालयाला भेट दिली होती.
दरम्यान, इमॅन्युएल लीनेन यांनी ‘आयटीआय’लादेखील भेट दिली. यावेळी त्यांनी ‘डसॉल्ट स्किल अॲडमी’तील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आत्मनिर्भर भारताच्या सक्षमीकरणात फ्रान्स सहकार्याला तत्पर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.