उमरेड : शहरातील गजानन नगरी येथे सुमारे चार महिन्यांपासून विद्युत समस्या भेडसावत आहे. वारंवार विद्युत खंडीत होत असल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. दुसरीकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.
थोडी जरी वाऱ्याची झुळुक आली. पाऊस बरसला की, लगेच विद्युत खंडित होत असते. विद्युत गेल्यानंतर नागरिकांनी मोबाईलवर संपर्क केल्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद विद्युत अधिकाऱ्याकडून मिळत नाही, असाही आरोप येथील नागरिकांचा आहे.
चार महिन्यांपासून वारंवार ही समस्या उद्भवत आहे. यावर विद्युत विभागाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. विद्युत विभागाला या परिसरातील विद्युत समस्येचा शोध अद्याप घेता आला नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात ही समस्या सोडविण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
--
भुरटे-चोरट्यांचाही त्रास
बुधवारी पहाटेच्या सुमारास गजानन नगरी येथे एका घरात खिडकी उघडून चोरटे शिरले होते. घरातील काही सदस्य लगेच जागे झाले. सतर्कता बाळगल्याने चोरीची घटना टळली. परिसरात भुरटे-चोरट्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले जात आहे.