नागपूर : जून सुरू झाला की माेसमी पावसाची चाहूल लागत असते. उन्हाळा ओसरून काहीसा गारवा पसरलेला असताे. यावर्षीही वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन हाेत असल्याने अशीच स्थिती राहील असा अंदाज होता. मात्र उत्तर-पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी अचानक हवामान बदलले आणि पाऱ्याने उसळी घेतली. नवतपा संपला तरी उन्हाचा ताप मात्र कायमच आहे. हवामान विभागाने ५ जूनपर्यंत विदर्भात ‘हीट वेव्हज’चा इशारा दिला आहे. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच जूनच्या पहिल्या आठवड्यात उष्ण लहरी आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन हाेत असल्याच्या वृत्ताने दिलासा मिळाला होता. माेसमी वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण तयार झाल्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाजही गेल्या आठवड्यात होता. विशेष म्हणजे यापुढे उष्ण लहरी किंवा उन्हाचे चटके सहन करावे लागणार नाहीत, असा अंदाजही वेधशाळेने दिला. मात्र गुरुवारी अचानक तापमान वाढले. नागपुरात १.२ अंशाची वाढ हाेऊन पारा ४५ अंशावर गेला. चंद्रपूरमध्ये ४६.८ अंश तापमानाची नाेंद झाली, जी यंदाची सर्वाधिक तापमानाची नाेंद ठरली. शुक्रवारी त्यात आणखी भर पडली. हवामान विभागाने नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, गाेंदिया, अमरावतीत उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. ५ जूनपर्यंत तापमानात ३ ते ५ अंशांची सरासरी वाढ हाेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
शुक्रवार नागपूरसाठी सर्वाधिक उष्ण
शुक्रवारी नागपुरात तब्बल ४६.२ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. २४ तासात १.२ अंश तर ४८ तासात सरासरी ३.८ अंश तापमान वाढले आहे. त्यामुळे हा दिवस या उन्हाळ्यातील उष्ण दिवसांपैकी एक ठरला. चंद्रपूरला २४ तासात ०.४ अंशाची घसरण झाली असली तरी सर्वाधिक ४६.४ अंश तापमानाची नाेंद झाली, जी सरासरी ३.६ अंश अधिक आहे. याशिवाय गाेंदिया ४५.४, वर्धा ४५.२, अकाेला ४३.६ व अमरावती ४४.४ अंश तापमान नाेंदविले गेले, जे सरासरी ४ अंश अधिक आहे.
वेधशाळेकडून हलक्या पावसाचा अंदाज
दरम्यान, वेधशाळेने नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस हाेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र विदर्भात माेसमी पाऊस वेळेपूर्वी किंवा वेळेवर दाखल हाेण्याची शक्यता कमीच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
...