- युवावर्ग उत्साहात : सोशल मीडियावर होणार जल्लोष
आकांक्षा कनोजिया / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्रीदिन अर्थात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा होतो. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी १ ऑगस्ट रोजी मैत्री दिन साजरा करण्याच्या तयारीत युवा वर्ग उत्साहित आहे. कोरोना मार्गदर्शिकेनुसार शनिवार-रविवारी बाजार बंद असल्याने अनेकांनी फ्रेंडशिप बँड आधीच खरेदी केले आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी बाजारात रंगत चढली होती आणि शनिवारीही विशेष मार्गाने व्यवहार केले जात होते. मात्र, शाळा-कॉलेज आणि ट्युशन बंद असल्याने बहुतांश युवा वर्ग बाहेर पडण्यासाठी पालकांना कोणताही बहाणा सांगू शकणार नाहीत. कोरोना निर्बंधामुळे अनेकांनी शहराजवळ असलेल्या पिकनिक स्पॉटवर जाऊन मैत्री दिन साजरा करण्याची योजना आखली आहे. सोबतच शनिवारी व रविवारी शहरातील दुकाने व रेस्टेराँ बंद राहणार असल्याने म्हणावे तसे सेलिब्रेशन करता येणार नाही. त्यामुळे, सेल्फी घेऊन सोशल मीडियावर अपलोड करूनच बहार आणण्याची तयारी सुरू आहे.
सेल्फी अपलोड करण्याला पसंती
सेल्फीची क्रेझ प्रचंड वाढत आहे. कुठल्याही प्रसंगातील सेल्फी सोशल मीडियावर शेअर करणे आणि आनंद व्यक्त करण्याचा ट्रेंड युवावर्गात आहे. यासोबतच आता हॅश टॅगचा वापर करता शुभेच्छा दिल्या जात आहे. थेट भेटता येत नसले तरी सोशल मीडियावर सेल्फी अपलोड करून सेलिब्रेशन करणे सोयीस्कर झाल्याची भावना युवावर्गातून व्यक्त होत आहे.
प्री-शॉपिंगसाठी बाजारात उसळली गर्दी
फ्रेण्डशिप डेच्या पार्श्वभूमीवर फ्रेण्डशिप बँड खरेदीकरिता बाजाराला रंगत आली. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमुळे युवकांनी ऑनलाईन मैत्री दिन साजरा केला. यंदाही तशीच स्थिती आहे. मात्र, लॉकडाऊन शिथिलतेचा थोडा लाभ घेण्याची आणि सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. फ्रेण्डशिप बँडच्या किमतीतही यंदा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आऊटर पिकनिकची तयारी
फ्रेंडशिप डेच्या पर्वावर युवा वर्ग शहराला लागून असलेल्या झिल्पी मोहगाव तलाव, हिंगणा येथे असलेले बरेच वॉटर फाॅल्स, रामटेक, रामधाम, खिंची, घोडझरी, रामाडॅम, रावणवाडी, खेकडानाला, आदी पिकनिक स्पॉटवर जाण्याच्या तयारीत आहेत.
...............