लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी ‘फ्रेंडशीप डे’ म्हटले की डोळ्यासमोर येते तो उत्साह, बेधुंदपणा व एका चौकटीत अडकलेली तरुणाई. ‘फ्रेंडशीप डे’चे समीकरणच त्यांच्यासाठी धम्माल आणि मस्ती असेच असते. मात्र समाजातील अनेक तरुणांनी सामाजिक भानदेखील जपले असून ‘फ्रेंडशीप डे’ वेगळ्या तऱहेने साजरा करण्यावर त्यांचा भर असतो. अंबाझरी गार्डनमध्ये तरुणाईचे असेच काही प्रतिनिधी एकत्र आले व त्यांनी भटक्या श्वानांमध्ये ‘मित्र’ शोधण्याचा प्रयत्न केला. या श्वानांना हक्काचे घर मिळावे व जनावरांवरील अत्याचाराबाबत जनजागृती व्हावी या संकल्पनेतून त्यांनी अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. यावेळी उपस्थितांनी भावनेचा ओलावा व मायेची फुंकर अनुभवली.भटक्या श्वानांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्मिता मिरे यांच्या ‘सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे रविवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध महाविद्यालयांतील शंभरहून अधिक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. शिवाय अनेक नागरिकदेखील आले होते. काही जणांनी आपल्या घरी पाळलेले श्वान आणले होते. संस्थेच्या ‘शेल्टर’मध्ये असलेले भटके श्वान व हे पाळलेले श्वान यांना एकत्रितपणे वेळ घालवू देण्यात आला. यावेळी भटक्या श्वानांना काही लोकांनी दत्तकदेखील घेतले. संस्थेतर्फे जनावरांवरील वाढते अत्याचार कमी व्हावे आणि प्लास्टिकचा कमीत कमी उपयोग व्हावा यासाठी जनजागृतीदेखील करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून उपस्थितांना यासंदर्भात माहिती दिली व जनावरांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
लोकांचे विचार बदलण्याचा प्रयत्न‘फ्रेंडशीप डे’ साजरा करण्याचा आमचा वेगळा प्रयत्न होता. एरवी भटक्या श्वानांना कुणीच आपुलकीने जवळ घेत नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना या श्वानांजवळ नेण्यात आम्हाला यश आले. लोकांचे विचार बदलण्याची आवश्यकता आहे व त्यासाठीच आम्ही कार्य करत आहोत, असे मत स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.