योगेश पांडे
नागपूर : आईवडिलांच्या अंगाखांद्यावर खेळण्या-बागडण्याचे वय असताना वसंता दुपारे या क्रूरकर्म्याची तिच्यावर नजर पडली आणि वयाच्या ४५ व्या वर्षी त्याने उमलणारी कळी कुस्करून टाकत तिला अक्षरश: दगडाने चिरडले. १५ वर्षांअगोदरच्या उन्हाळ्यातील ही गोष्ट असली तरी परिसरातील नागरिकांच्या अंगावर आजदेखील काटा उभा राहतो. फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी वसंताने आटोकाट प्रयत्न केले व साळसूदपणाचादेखील आव आणला. मात्र प्रत्यक्षात त्याने केलेली हत्या ही ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’मध्येच मोडत होती. मुलीची हत्या केल्यावरदेखील तो काहीच घडले नाही अशा आविर्भावात वावरत होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची दया याचिका फेटाळली आणि समाजमनातील कटू आठवणी परत ताज्या झाल्या.
वसंता दुपारे हा सुतारकाम कारागीर होता व ओळखीच्याच कुटुंबातील चार वर्षीय मुलीचा त्याने बळी घेतला. चॉकलेटच्या बहाण्याने मुलीला नेत अत्याचार केल्यानंतरदेखील त्याला पश्चात्ताप झाला नव्हता. ही घटना केल्यावर सुरक्षारक्षकांशी गप्पा मारत परिसरात तो अगदी सहजपणे फिरत होता. मात्र मुलीच्या वडिलांना संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीतदेखील ‘तो मी नव्हेच’ अशीच भूमिका तो मांडत होता. मात्र अखेर पोलिसी खाक्यापुढे त्याचा निर्ढावलेपणा टिकला नाही व त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती.
त्याचाही झाला असता ‘अक्कू’
या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत त्याला ताब्यात देण्याची मागणी केली होती. तत्कालीन पोलिस उपायुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी अतिरिक्त बंदोबस्त लावण्याचे निर्देश दिले होते. जर वेळेवर पोलिस बंदोबस्त लागला नसता तर त्याचीदेखील ‘अक्कू यादव’सारखी हत्या होण्याची शक्यता होती.
फाशी टाळण्यासाठी विविध कारणे
‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ करूनदेखील सुधारण्याची संधी द्यावी, असे म्हणत त्याने फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या. फाशी टाळण्यासाठी अगोदर त्याच्या वयाचे कारण देण्यात आले. त्यानंतर त्याच्या शिक्षणावर भाष्य करण्यात आले. तो पदवी परीक्षेचा अभ्यास करत होता व गांधीविचार तसेच तत्त्वज्ञान कार्यशाळांमध्ये तो सहभागी झाला होता, तो उत्तम चित्रकार आहे अशी कारणेदेखील त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दिली होती. मात्र त्याने केलेले कृत्य इतके नृशंस होते की, त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा होऊच शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
नागपूर कारागृहातच होणार अंत ?
वसंता दुपारे हा सद्य:स्थितीत नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. मागील अनेक वर्षांपासून तो नागपूर कारागृहातच आहे. कारागृहात सद्य:स्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले आठहून अधिक कैदी आहेत. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेननला नागपूर कारागृहात फाशीची शिक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एकाही आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. आता वसंता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका करतो का, यावर पुढची प्रक्रिया अवलंबून राहणार आहे.
डोके ठेचून केली होती हत्या
वसंताच्या वासनेची शिकार ठरलेली ही निरागस मुलगी नागपूरमध्ये वाडी भागात कदगाव-कळमेश्वर मार्गावरील शिवशक्ती नगर येथे कुशाल बनसोड यांच्या चाळीत राहायची. वसंता त्याच्या शेजाऱ्यांचा मित्र होता व तो नेहमी त्यांच्याकडे यायचा. ३ एप्रिल २००८ रोजी वसंता आला तेव्हा ही मुलगी घराबाहेर खेळत होती. वसंताने तिला नागपूरच्या चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून सायकलवर नेले व एका गोदामाजवळच्या झुडपांमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून दगडांनी तिचे डोके ठेचत खून केला. या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता व संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चादेखील नेला होता.