नागपूर : कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असलेली पंढरपूर वारी घडविण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी केली आहे. आज सोमवारपासून नागपूर - पंढरपूर ही विशेष रेल्वेगाडी भाविकांच्या सेवेत धावणार आहे. यंदा पंढरपूर वारीने मध्य रेल्वेलाही आकर्षित केले आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेतर्फे पंढरपूर आषाढ वारीसाठी तब्बल ७६ रेल्वेगाड्या चालविण्याची तयारी मध्य रेल्वेने केल्याचे यापूर्वीच घोषित झाले आहे.
पंढरपूर स्पेशलमध्ये नागपूर- पंढरपूर, नागपूर - मिरज यासह नवीन अमरावती- पंढरपूर, खामगाव- पंढरपूर, भुसावळ- पंढरपूर, लातूर- पंढरपूर, मिरज- पंढरपूर, मिरज- कुर्डूवाडी या विशेष गाड्यांचाही समावेश आहे. ‘पंढरपूर आषाढी एकादशी’निमित्त त्या नमूद रेल्वेस्थानकांवरून चालविल्या जाणार आहेत. त्यानुसार, आजपासून नागपूर- पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडी (क्रमांक ०१२०७ ) नागपूर स्थानकाहून २६ जून आणि २९ जून २०२३ रोजी सकाळी ८:५० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ही गाडी भाविकांना पंढरपूरला पोहाेचविणार आहे.
त्याप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक १२०८ पंढरपूर येथून २७ आणि ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दाेन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन राहणार आहे.येथील भाविकांचीही होईल सोयया गाड्यांचे थांबे अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे राहणार आहे. त्यामुळे जाता येताना नमूद गावच्या आणि परिसरातील भाविकांचीही प्रवासाची सोय होणार आहे.