लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांनी उद्योगाची कास धरावी व त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी त्यांना उद्योगाची जोड मिळणे आवश्यक आहे. महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोन कार्यालय परिसरात लवकरच ‘फ्रुट स्टॉल कॅन्टीन‘ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी केली.विविध विषयांच्या अनुषंगाने शुक्रवारी महिला व बालकल्याण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समिती सभापती संगीता गिऱ्हे यांच्यासह उपसभापती दिव्या धुरडे, सदस्या मंगला खेकरे, मनिषा अतकरे, नेहा निकोसे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री राजू भिवगडे, गणेश राठोड, हरीश राऊत, सहायक आयुक्त स्नेहा करपे, किरण बगडे आदी उपस्थित होते.महिलांच्या उत्थानासाठी मनपाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ महिलांना मिळावा व त्यातून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या हा यामागील हेतू आहे. त्यातून प्रत्येक झोनमध्ये ‘फ्रुट स्टॉल कॅन्टीन’ सुरू केले जाणार आहे. महिला बचत गटांना ११ महिन्यांसाठी हे फ्रुट स्टॉल कॅन्टीन चालविण्याकरिता देण्यात येणार आहे. यासाठी ईश्वर चिठ्ठीद्वारे महिला बचत गटांची निवड केली जाईल. ११ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बचत गटांना संधी मिळेल, अशी योजना आहे. यासंदर्भात आवश्यक ती सर्व कार्यवाही झोन सहायक आयुक्तांनी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिºहे यांनी दिले.महिला उद्योजिका मेळावा १९ ते २६ जानेवारीदरम्यानमहिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी दरवर्षी मनपाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात येतो. यावर्षी १९ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. मनपा तसेच शासनातर्फे महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे फलक मेळाव्यात ठिकठिकाणी लावण्यात यावेत. महिला उद्योजिका मेळावा स्थळी अग्निशमन सुविधा, रुग्णवाहिका यासह स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात यावी,असेही निर्देश गिऱ्हे यांनी दिले.