योगेश पांडे
नागपूर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला मिळालेला प्रतिसाद व त्यानंतर ‘सोशल मीडिया’वर प्रसारित झालेली छायाचित्रे यावरून शहरातील विरोधकांना ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे. या सभेला खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत नेण्याचे खरे श्रेय भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांना जात असल्याचा टोला विरोधकच लगावत आहेत. मात्र, या एकूण विरोधनाट्यावरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. नियमित राजकीय सभांसारखे ज्या सभेचे आयोजन होऊ शकले असते तिला ‘मायलेज’ देण्याचे काम अनावश्यक विरोधाने केले असल्याची भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. तसेच खोपडे व डिकोंडवार तसेच सहभागी झालेल्या इतर पदाधिकाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर आहे.
महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या वेळापत्रकाची घोषणा केली त्यावेळी कुणाकडूनच कुठला विरोध वगैरे झाला नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी सद्भावनानगरातील दर्शन कॉलनीतील मैदानाची चाचपणी केली आणि राजकारण तापायला सुरुवात झाली. ही सभा तेथे आयोजित करण्याची परवानगी मागण्यात आली होती व नासुप्रने लेखी परवानगी दिली. हे खेळाचे मैदान असून, राजकीय सभेमुळे ते खराब होईल, असा आक्षेप स्थानिक नागरिकांनी घेतला. त्यानंतर, आ. कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी नासुप्र सभापतींना पत्र दिले व महाविकास आघाडीच्या सभेसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. एकीकडे भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी ही सभा मैदानात होऊ देण्यास काहीच हरकत नसल्याची भूमिका स्पष्ट केली असताना दुसरीकडे दर्शन कॉलनीतील आंदोलन आयोजित करण्यापासून तेथे निदर्शने देण्यात भाजपचे अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक आघाडीवर होते. अशा स्थितीत राजकारण तापले व संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील ही सभा प्रतिष्ठेचा मुद्दा बनविली व रविवारी नेते आक्रमक पवित्र्यात दिसून आले. भाजपच्या नेत्यांचेदेखील या सभेकडे बारीक लक्ष होते. या सभेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे, त्यावरून अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोधनाट्याबाबतच नाराजी व्यक्त केली आहे. वरिष्ठ नेते, शहराध्यक्षांचा मैदानात सभेच्या आयोजनाला विरोध नव्हता तर खोपडे व इतर पदाधिकाऱ्यांना हा आंदोलनाचा प्रकार करण्याची आवश्यकताच नव्हती, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखविली.
राजकीयच ठरले आंदोलन
हे आंदोलन स्थानिकांचे असल्याचा सुरुवातीला दावा करण्यात आला होता. ज्या पद्धतीने राजकीय कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते, त्यावरून प्रत्यक्षात हा विरोध व आंदोलन हे राजकीयच ठरले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पक्षात नेत्यांचे ऐकले जाते असा दावा केला जातो, तेथेच शहराध्यक्षांच्या भूमिकेचा उघडपणे विरोध झाला. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांच्याशी प्रतिक्रियेबाबत संपर्क होऊ शकला नाही.