लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शेख इकबाल, रा. कामठी याच्या खूनप्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आराेपीचा कामठी (नवीन) पाेलीस तीन वर्षांपासून शाेध घेत हाेते. त्याला अटक करण्यात पाेलिसांना गुरुवारी (दि. २८) रात्री ८ वाजेच्या सुमारास यश आले. कामठी नजीकच्या अब्दुल्ला शहा बाबा दर्गा परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
नसरुद्दीन शेख खुर्शिद शेख (३२, रा. कोठारी गॅस गोडाऊन, रामगड, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आराेपीचे नाव आहे. नसरुद्दीन शेख खुर्शिद शेख व त्याच्या चार साथीदारांनी जानेवारी २०१८ मध्ये शेख इकबाल, रा. कामठी याचा खून केला हाेता. घटनेनंतर नसरुद्दीन शेख खुर्शिद शेख नागपूर जिल्ह्यातून पळून गेल्याने पाेलीस त्याचा शाेध घेत हाेते. मध्यंतरी ताे संतोषी पारा, कॅम्प-२, भिलाई, जिल्हा दुर्ग (छत्तीसगड) येथे वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्याने पाेलिसांनी तिथेही त्याचा शाेध घेतला हाेता. मात्र, पाेलिसांची कुणकुण लागल्याने ताे तिथूनही पळून गेला हाेता.
दरम्यान, ताे गुरुवारी (दि. २८) रात्री कामठी परिसरातील अब्दुल्ला शहा बाबा दर्गा येथे आल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास या भागात सापळा रचून शिताफीने त्याला अटक केली. त्याच्या विराेधात कामठी (नवीन) पाेलीस ठाण्यात भादंवि ३०२, ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, १४४, १४७, १४८, १४९, १२० (ब) यासह एकूण १७ विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. ही कामगिरी पाेलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, दिलीप कुबरे, राजेंद्र टाकळीकर, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, मंगेश गिरी, श्रीकांत श्रेतुडकर यांच्या पथकाने केली.