लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : आपतूर (ता. कुही) येथील नागरिकांची २० लाख ५१ हजार ६३६ रुपयांनी फसवणूक करून पळून गेलेल्या आराेपी संस्था संचालकास अटक करण्यात कुही पाेलिसानी दीड वर्षानंतर यश आले. त्याला नागपूर शहरातील बेसा परिसरातून बुधवारी (दि. ३) दुपारी २ वाजताच्या सुमारास ताब्यात घेत अटक करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली.
अशोक माेतीराम झनके (५८, व्यंकटेश कॉलनी, घोगली रोड, बेसा, नागपूर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. ताे महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था, उमरेड या संस्थेचा संस्थापक व संचालक आहे. आपतूर येथील काही विकास कामे करण्यासाठी या संस्थेची निवड करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आदर्श गाव ग्राम समिती तयार करण्यात आली होती. अशाेक झनके हा या समितीचा अध्यक्ष होता. आदर्श गाव ग्राम समितीच्या नावे बँक ऑफ बडोदाच्या बाह्मणी (गावसूत) शाखेत शासकीय बँक खाते उघडण्यात आले. या समितीचा अध्यक्ष, कृषी पर्यवेक्षक व ग्राम कार्यकर्ता या तिघांना या खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात आले.
अशाेक झनके याने जीएसटी भरावयाची आहे, असे सांगून या समितीच्या एका चेकवर (क्रमांक-००००२१) २५,६३६ रुपये नमूद करून त्यावर कृषी पर्यवेक्षक व ग्राम कार्यकर्ता या दाेघांची स्वाक्षरी घेतली. परंतु, त्याने या चेकवर तारीख व रकमेचा अक्षरात उल्लेख केला नव्हता. त्याने याच चेकवर पहिल्या २ या आकड्यासमाेर ० व ५ नंतर १ आकडा लिहून चेकवरील एकूण रक्कम २०,५१,६३६ रुपये एवढी केली. त्याने हा चेक वटविण्यासाठी त्याच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वर्धा रोड,
नागपूर येथील शाखेतील खात्यात (क्रमांक-३३३०९६६९०८) जमा केला. हा चेक वटल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यामुळे ९ मार्च २०२० राेजी त्याच्या विराेधात कुही पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला. त्याला नागपूर शहरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. ही कामगिरी सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश साेनटक्के, गिरधारी राठाेड, समाधान पवार यांच्या पथकाने केली.
...
एटीएमजवळ रचला सापळा
कुही पाेलीस मार्च २०२० पासून अशाेक झनके याचा शाेध घेत हाेते. पाेलिसांनी त्याच्या नागपूर शहरातील मूळ पत्त्यावर शाेध घेतला असता, ताे तिथेही राहात नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, ताे बुधवारी (दि. ३) दुपारी बेसा (नागपूर) चाैकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यामुळे पाेलिसांनी या एटीएम परिसरात सापळा रचला हाेता. ताे एटीएम खाेलीत जाऊन रकमेची उचल करीत असतानाच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले.