लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांना विविध उपक्रमांतर्गत अनुदान दिले जायचे. पण अभियानांतर्गत दिलेला निधी खर्चच झाला नसल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला आहे. २०१८-१९ या सत्रापासून सर्व शिक्षा अभियानाचे रुपांतर समग्र शिक्षा अभियानात करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानाच्या अखर्चित निधीचा ३१ मार्च पूर्वी विनियोग करावा, असे आदेश राज्य प्रकल्प संचालकांनी दिला आहे.राज्य प्रकल्प संचालकांनी उपशिक्षण अधिकारी शहर साधन केंद्र व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना पाठविलेल्या पत्रामध्ये २००३-०४ पासून २०१७-१८ पर्यंतच्या अखर्चित रकमा योग्य प्रकारे विनियोग झाल्यास २०१९-२० पासून समग्र शिक्षा योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा ताळमेळ ठेवणे शक्य होईल. २००२ पासून सर्व शिक्षा अभियानाचा ग्राम शिक्षण समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून १०० टक्के निधी शाळा स्तरावर विनियोग झाला नसल्याचे दिसून येते. २०१८-१९ पासून समग्र शिक्षा योजनेच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वीचा सर्व शिक्षा अभियानाचा निधी खर्च होणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद आहे.
यावर करा खर्चसर्व शिक्षा अभियानाचा अखर्चित निधी शाळा व्यवस्थापन समितीकडून खर्च होत नसल्यास गटशिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून शाळांचे थकीत वीज देयक भरून वीज पुरवठा पूर्ववत करावा. शाळेची इमारत, वर्ग खोली, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था आदीवर खर्च करावा. शाळेतील स्वच्छतागृहाची देखभाल दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर खर्च करण्याचे निर्देश दिले आहे.
३१ मार्चला सुरू ठेवल्या शाळा३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सर्व शिक्षा अभियानात खर्च झाला नसलेल्या निधीचे विनियोजन करण्यासाठी तसेच समग्र शिक्षा अभियानांतर्गत खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद, महापालिकेच्या शिक्षण विभागाची कार्यालये व शाळाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे रविवार असला तरी शहर आणि जिल्ह्यातील अनेक शाळा सुरू होत्या.