मंगळवारी झोनमधील ९.२६ कोटींच्या कामांना मिळणार मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळताच झोननिहाय खर्चाला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी झोनमधील गुंठेवारी ले-आऊटमधील विकासासाठी निधी ९.२६ कोटींच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
या झोनमधील गुंठेवारीअंतर्गत ५७२-१९०० ले-आऊट येतात. देखभाल व विकास निधीअभावी रखडला आहे. झोननिहाय अर्थसंकल्प सादर न केल्याने लहानसहान कामात अडचण येत आहे. सांगितलेली कामे होत नसल्याने नागरिकात नाराजी आहे. नगरसेवकही नाराज आहेत. आता झोननिहाय खर्चाला मंजुरी दिली जात आहे.
झोनमध्ये १.८७ कोटीचा महसुली खर्च व ७.३९ कोटीच्या भांडवली खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. झोनच्या नगरसेविका संगीता गिऱ्हे यांनी झोन अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. गुंठेवारीची कामे नासुप्रकडे परत गेल्याने झोनमधील कामे प्रभावित होणार आहेत. मनपा निधीतून या भागाचा विकास शक्य नाही. यामुळे स्थायी समितीने झोनमधील ले-आऊटमधील विकास कामासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. मनपा निवडणूक विचारात घेता, सत्तापक्षाने पावसाळ्यापूर्वी सर्व झोनच्या खर्चाला मंजुरी देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
....
कॅम्पसमध्ये कोविड रुग्णालय उभारणार
नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये २०० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. यावर १.२९ कोटी रुपये खर्च होतील. ३० आयसीयू, २० एनआयसीयू व १५० ऑक्सिजन बेड राहतील. पाईपलाईन व अन्य सुविधा निर्माण केल्या जातील.