सौरभ ढोरे
काटोल : कोरोनाने आर्थिक संकट ओढवले. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करून घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली, तर काहींनी उसणवारी करून घरे बांधली. आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल, अशी लाभार्थींना अपेक्षा होती. मात्र वर्ष निघून गेले तरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधी मिळालेला नाही.
‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून देशभर पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. मात्र वर्ष झाले तरी घरकुलाचा हप्ता मिळाला नसल्याने कर्ज काढून घरकुल बांधणाऱ्यांपुढे आता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शासनाकडून घरकुल मंजूर झाल्यानंतर तालुक्यातील अनेकांनी जीर्ण घरे पाडून आवास योजनेअंतर्गत नवीन घरे बांधायला सुरुवात केली. काहींनी भाडेतत्त्वावर राहून घरकुलाच्या कामाला सुरुवात केली. उसनवारीने पैसे घेऊन बांधकाम पूर्णत्वास नेले; मात्र योजनेचे हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे. एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घरभाड्याचा भार यामुळे लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
---
सहा टप्प्यात मिळतोय निधी
योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासन असे मिळून २ लाख ५० हजार रुपये लाभार्थींना देतात. त्यामध्ये राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपयातून पहिल्या टप्प्यात ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ४० टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम दिली जाते. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या दीड लाखातून पहिल्या टप्प्यात ६० टक्के, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी दिला जातो. अशा एकूण सहा टप्प्यात लाभार्थींना निधी वितरित केला जातो.
--
६८९ घरकुले मंजूर
काटोल नगरपालिका क्षेत्रात एकूण ६८९ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. याकरिता पहिल्या हप्ता राज्य शासनाकडून ५४२ लाख व केंद्र शासनाकडून ३२९ लाख एवढा निधी प्राप्त झालेला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचे लाभार्थींना वितरण करण्यात आले आहे. पण उर्वरित निधी आलाच नसल्याने लाभार्थींना कसा देणार? आम्ही निधीची मागणी केली आहे. शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहोत.
- राजेंद्र काळे,
अभियंता, नगर परिषद, काटोल
--
मागील एक वर्षापासून आवास योजनेचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. जुने घर पाडून उसनवारी पैसे घेत नवीन घराचे बांधकाम केले. आता कोरोनाने रोजगारही गेला. सरकारने घर बांधकाम पूर्ण झालेल्यांना तातडीने निधी द्यावा.
- शोभा नारायण रेवतकर
लाभार्थी, तेलीपुरा, काटोल
--
प्रधानमंत्री आवस योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने आनंद होता. आता आपले घरसुद्धा पडके राहणार नाही याची खात्री झाली. पहिला हप्ता बँकेत जमा झाला. घराचे काम अर्ध्यावर आले, मात्र दुसरा हप्ता मिळाला नाही. जुने घर पडल्याने नवीन घर बांधणे आवश्यक होते. इकडून-तिकडून पैसे घेऊन गरज पूर्ण केली. दीड वर्ष झाले, मात्र उर्वरित हप्ते अद्याप मिळाले नाही.
- आशा किशोर तिवारी
लाभार्थी, देशमुखपुरा काटोल
---
घरकुल यादीत नाव आल्याने घराचे बांधकाम सुरू केले. दोन हप्ते मिळाले. त्यानंतर पैसे न आल्याने घरचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडले आहे. यामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. किती दिवस झोपडीत राहावे लागेल हा विचार दीड वर्षापासून करत आहे.
- रामदास शिरपूरकर
लाभार्थी, पेठ बुधवार, काटोल