नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण नागपूरतर्फे गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत सोमवारी सक्करदरा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात निदर्शने केली व गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविला. पेट्रोलचे दर १०५ रुपयांवर गेले आहेत. गॅस सिलिंडर आणखी २५ रुपयांनी महागला आहे.. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे प्रचंड महागाई, बंद पडलेले उद्योग व बेरोजगारी यामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे.आपत्तीमुळे हतबल झालेला शेतकरी इंधन व खतांच्या भाववाढीमुळे शेती करायची तरी कशी या चिंतेत आहे. वाहतूक दर महागल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रावर याचा प्रतिकूल प्रभाव पडला आहे. व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वप्रकारची दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण नागपूर अध्यक्ष अशोक काटले, प्रवक्ता श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. आंदोलनात माजी आ. दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, बजरंगसिंग परिहार, राजाभाऊ टाकसाळे, जानबा मस्के , आभा पांडे , प्रशांत पवार , ईश्वर बाळबुधे , वासिम पटेल, वर्षा शामकुळे, योगेंद्र जैस, मोहसीन शेख, विक्रम परिहार, एकनाथ फलके, स्वाती कुंभलकर, अविनाश शेरेकर आदींनी भाग घेतला.
राष्ट्रवादीने काढली गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:08 AM