लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड: नागपूरच्या डॉक्टर मुलाशी ती विवाहबंधनात अडकणार होती. १० जानेवारीला तिचा विवाह ठरला होता. कुटुंबासह आप्तस्वकीय सारेच लग्न सोहळ्याच्या तयारी होते. घरासमोर मंडपही सजला. अशातच क्रूर काळाने तिला हिरावून नेले. सजलेल्या लग्न मंडपातूनच तिची अंत्ययात्रा निघाली. अनेकांना चटका लावणारा हा प्रसंग उमरेड परसोडी (जि. नागपूर) येथे गुरुवारी साऱ्यांना अक्षरश: रडवून गेला.
काळाने हिरावून नेलेल्या तरुण प्राध्यापिकेचे नाव डॉ. नीलिमा सुखदेव नंदेश्वर (३५, परसोडी, उमरेड) आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान समुद्रपूर (जि. वर्धा) नजीक असलेल्या पाईकमारी शिवारात हा अपघात झाला. नीलिमा यांची आई प्रभा नंदेश्वर या सुद्धा त्यांच्या सोबतीला होत्या. कारने झालेल्या या अपघातात प्रभा नंदेश्वर यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नीलिमा नंदेश्वर या आनंदवन वरोरा येथे आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कर्तव्यावर होत्या. कृषी अर्थशास्त्रात त्यांनी पीएच.डी सुद्धा केलेली आहे. त्यांचा विवाह नागपूर येथील डॉ. अश्विन टेंभेकर यांच्याशी ठरला होता. उमरेड (ठाणा) परिसरातील रिसोर्टवर त्याची छोटेखानी तयारी सुद्धा सुरू होती. विवाहापूर्वी आज काही महाविद्यालयीन कामकाज आटोपून घेण्यासाठी प्रा.नीलिमा आणि आई प्रभा दोघीही उमरेड येथून अल्टो कारने समुद्रपूरच्या दिशेने निघाल्या. नीलिमा स्वत: कार चालवित होत्या. अशातच समुद्रपूरनजीक असलेल्या पाईकमारी शिवारात कार अनियंत्रित झाली. रस्त्यानजीकच्या खड्ड्यात त्यांची कार कोसळली. कारने दोन पलट्या मारल्या. अपघात होताच नागरिक मदतीला धावले. पलटलेल्या कारमधून दोघींनाही बाहेर काढले. तत्पुर्वी नीलिमा यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर भिवापूर मार्गस्थित स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वप्नांची राखरांगोळीनीलिमा तीन दिवसानंतर सासरी जाणार होती. आयुष्याची सुखी स्वप्ने रंगवीत असतानाच अचानकपणे झालेल्या अपघातात तिची प्राणज्योत मालवली. लगीनगाठ बांधण्यापूर्वीच प्रेतयात्रा निघाली. प्राध्यापक नीलिमा हिच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा हा अपघात ठरला.
सारेच अबोल झालेनीलिमा यांचा भाऊ पुण्याला इंजिनिअर आहे. बहीण वसईला डॉक्टर तर लहान बहीण नागपूरला वास्तव्याला असून यांच्यासह संपूर्ण गोतावळ उमरेड येथे गोळा झाला होता. सकाळीच महाविद्यालयात जाऊन लवकर परत येणार असे सांगून गेलेल्या नीलिमाचे प्रेतच आल्याने सारेच अबोल झाले होते.