लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्यांना अत्यंत निर्दयपणे संपवले त्या पत्नी-मुलांसोबतच क्रूरकर्मा आलोक ऊर्फ चंदू अशोक मातूरकर (वय ४५) याच्यावरही त्याच्या कुटुंबीयांनी एकत्र अंत्यसंस्कार केले. दुसरीकडे आलोकच्या क्राैर्याला बळी पडलेल्या लक्ष्मीबाई देवीदास बोबडे (आरोपीची सासू) आणि अमिषा (मेहुणी) या दोघींवर देवीदास बोबडे आणि त्यांच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले.
विजया आलोक मातूरकर (वय ४०), परी (१५) आणि साहिल (१२) तसेच लक्ष्मीबाई (५५) आणि अमिषा (२१) या पाचजणांची हत्या करून आरोपी आलोकने आत्महत्या केली. उपराजधानी सुन्न करणाऱ्या या हत्याकांडाची माहिती सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास उघड झाली. या हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त लोहित मतानी, उपायुक्त सारंग आवाड, ठाणेदार जयेश भांडारकर आणि त्यांचे सहकारी ३६ तासांपासून सलग प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी मृतांचे नातलग, मित्र, शेजारी यांचे बयाण नोंदवले. मंगळवारी पुन्हा दोन्ही घरांतील साहित्य तपासणी केली. मृत तसेच आरोपींचे मोबाईल, त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे आणि इतर काही वस्तू जप्त केल्या. आरोपी आलोकच्या अमरावती येथील घराशी संबंधित कर्जाची (बँकेची) फाईल आणि चिठ्ठ्याही पोलिसांनी जप्त केल्या. शवविच्छेदन आटोपल्यानंतर विजया, परी, साहिल आणि मृत आरोपी आलोक अशा चाैघांचे मृतदेह आलोकचे भाऊ विवेक मातूरकर यांनी ताब्यात घेतले. विवेक आणि त्यांचे भाऊ, बहिणी शांतिनगरात राहतात. त्यांनी या चाैघांवर अंत्यसंस्कार केले. तर, पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगी अमिषाचा मृतदेह ताब्यात घेऊन देवीदास बोबडे आणि नातेवाइकांनी मायलेकींवर अंत्यसंस्कार केले.
---
ती लग्नातून परतली होती
सख्ख्या बहिणीच्या नवऱ्यासोबत (आरोपी आलोक) अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या अमिषाच्या ‘सैराट’पणामुळे हे अमानुष हत्याकांड घडल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी दुपारी आपल्या मित्र-मैत्रिणीसह शॉपिंग करत फिरणारी अमिषा रात्री एका लग्नात गेली होती. तिकडून ती ‘वेगळी जागा शोधण्याचा निर्णय’ घेऊन घरी परतली होती. काही वेळानंतर आलोक काळ बनून तिच्या घरात येईल, अशी तिला कल्पनाही नव्हती.
---
अंडी, मटन अन् आरोपी
गेल्या वर्षीपर्यंत परिश्रमपूर्वक संसार उभा करणारा आरोपी आलोक अमिषासाठी वेडापिसाच झाला होता. त्याने कामधंदाही बंद केला होता. आळशीपणामुळे त्याने घरमालकाचे भाडे अन् विजेचे बिलही थकविले होते. तो कधीही मटन, चिकन खात नव्हता. केवळ अंडी खायचा. रविवारी मात्र त्याने घरात मटन आणले अन् सर्वांसोबत त्याने ते खाल्ले. खाण्यापिण्यातून त्याने कुटुंबीयांना काही विषाक्त अथवा गुंगीचे पदार्थ दिले की काय, अशी शंका आहे.
---