अभय लांजेवार
उमरेड : होम क्वारंटाईन असलेल्या वायगाव वेकोलि परिसरातील ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीची प्रकृती शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बिघडली. छातीत दुखत असल्याने आणि श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने सदर रुग्णाने स्वत:च्या चारचाकी वाहनाने उमरेडचे ग्रामीण रुग्णालय गाठले. याठिकाणी औषधोपचारासाठी मदतीची याचना केली. तब्बल तीन तास उलटूनही कोणत्याही प्रकारची सुविधा या रुग्णास मिळाली नाही. उमरेड येथे कोविड सेंटरची सुविधाच उपलब्ध नसल्याने कोरोना सुविधांचा कसा फज्जा उडाला आहे, याचे गंभीर उदाहरण प्रत्यक्षपणे बघावयास मिळाले.
उमरेडच्या कोविड सेंटरबाबत तातडीने निर्णय घेण्यात न आल्यास असंख्य नागरिकांना याची झळ पोहोचणार आहे. वायगाव वेकोलि येथील निवासी असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर भिवापूर येथील कोविड सेंटरमधून त्या महिलेस नागपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. एकीकडे पत्नीवर नागपूर येथे उपचार सुरू असताना दुसरीकडे पती, मुलगा आणि मुलगी यांनाही होम क्वारंटाईन व्हावे लागले. अशातच शुक्रवारी सकाळच्या सुमारास होम क्वारंटाईन असलेल्या कामगाराचा त्रास वाढला. लागलीच आरोग्यसेविका पोहोचली. तिने ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. स्वत:च चालक बनत सदर कामगाराने उमरेडचे ग्रामीण रुग्णालय गाठले. सकाळी ९ वाजतापासून त्याने रुग्णालयात मदतीची विनंती केली. मदतीसाठी १०८ रुग्णवाहिकेस कळविण्यात आले. कन्फर्मेशन सर्टिफिकेट (पुष्टी प्रमाणपत्र) नसल्याने रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. तब्बल तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास रुग्णाने स्वत:च वाहन चालवीत भिवापूरचे कोविड सेंटर गाठले. येथून लागलीच प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर सदर रुग्णाचा १०८ रुग्णवाहिकेतून ‘भिवापूर टू नागपूर’ असा प्रवास झाला. वृत्त लिहिस्तोवर त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले. या संपूर्ण घटनाक्रमात मला चांगलाच मानसिक त्रास झाला, अशीही बाब सदर रुग्णाने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितली
मुलांची चिंता मिटली
पती-पत्नी दोघेही नागपूर येथे उपचार घेत असल्यामुळे घरी होम क्वांरटाईन असलेल्या मुलाची, मुलीची आणि वृद्ध आईची गैरसोय होईल, अशी चिंता सदर रुग्णाने संतोष महाजन यांच्याकडे व्यक्त केली. संतोषने लागलीच मित्र सौरभ पटेल आणि दीपक पांडे यांच्या कानावर ही बाब टाकली. अन्य काही जणांनी केवळ भोजनव्यवस्थेसाठी नाक मुरडल्यानंतर सौरभ आणि दीपकने सामाजिक दायित्त्व स्वीकारीत वेकोलि येथे होम क्वारंटाईन असलेल्यांना सुरक्षितरीत्या मदतकार्य केले.