सशस्त्र गुंडाचा भिवसनखोरीत हल्ला : मोठी घटना टळली, चौघांना अटक, सहा फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच तरुणीशी दोन गुन्हेगारी वृत्तीचे तरुण कनेक्ट झाल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर, एका गुंडाने आपल्या ८ ते १० साथीदारांसह प्रशील सुरेश चंद्रिकापुरे (वय २०) याच्या घरावर शुक्रवारी दुपारी हल्ला चढविला. आजूबाजूची मंडळी आणि पोलीस वेळीच घटनास्थळी धावल्यामुळे मोठा गुन्हा टळला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.
प्रशील सुरेश चंद्रिकापुरे (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो गिट्टीखदानमधील भिवसनखोरीत राहतो. त्याची एका तरुणीशी मैत्री आहे. याच तरुणीसोबत बबलू नामक तरुणही कनेक्ट असल्याने त्यांच्यात वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर, बबलूच्या टोळीतील एकाजणाला प्रशील चंद्रिकापुरेने मारहाण केली. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी बबलू वानखेडे, तुषार विनोद शेंडे, गणेश सुरेश दुबे, नितीन शेषरावजी गवळी, सुमित योगेश नारनवरे, प्रशिक देशभ्रतार आणि त्यांचे चार साथीदार शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घातक शस्त्र घेऊन प्रशीलच्या घरावर चालून आले. ते पाहून भिवसनखोरीतील नागरिकांनी या घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांचे पथक तिकडे धावले. पोलीस पोहोचण्यापूर्वी आरोपींनी प्रशीलच्या घरावर हल्ला चढविला होता. त्यांनी प्रशीलला बेदम मारहाण केली. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपी तुषार शेंडे, गणेश दुबे, नितीन गवळी आणि सुमित नारनवरे या चौघांना अटक केली. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
---