आशीष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची निष्काळजी व शिक्षण अध्ययन मंडळाच्या दुर्लक्षामुळे बीएडच्या विद्यार्थ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. परीक्षा विभागाने बीएडच्या तिसऱ्या सेमिस्टरचे निकाल अजूनही घोषित केले नाहीत. तर अध्ययन मंडळाने चौथ्या समिस्टरच्या परीक्षेच्या आयोजनास अनुमती दिली आहे. त्यामुळे बीएडचे विद्यार्थी यावर्षीही शिक्षकांसाठी होणारी पात्रता परीक्षा (टीईटी) देऊ शकणार नाहीत. टीईटी बरोबरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) सुद्धा त्यांना देता येणार नाही.
बीएड अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आपल्या समस्येबाबत विद्यापीठात विचारणा करीत आहेत. परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२० मध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे बीएड अभ्यासक्रमाची परीक्षा होऊ शकली नव्हती. ही परीक्षा जून २०२१ मध्ये घेण्यात आली. बीएड तिसऱ्या सेमिस्टरचा अंतिम पेपर २१ जून रोजी संपला. विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात घोषित होईल. परंतु ४० दिवसांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही निकाल लागला नाही. त्याचबरोब चौथ्या सेमिस्टर परीक्षेच्या आयोजनाबाबत अजूनपर्यंत तारीख निर्धारित केली नाही.
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बीएडच्या तिसऱ्या सेमिस्टरचे निकाल कधी घोषित होईल याबाबत स्पष्ट केले नाही. पण चौथ्या सेमिस्टर परीक्षेचे आयोजन ऑक्टोबरमध्ये होईल, असे त्यांनी सांगितले.
- दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला साडेतीन वर्ष
पूर्वी बीएडचा अभ्यासक्रम एकच वर्षाचा होता. नंतर दोन वर्षाचा अभ्यासक्रम करण्यात आला. आतापर्यंत विद्यार्थ्यांची चौथी सेमिस्टर व्हायला हवी होती. परंतु या अभ्यासक्रमाच्या बाबतीत गंभीरता नसल्याने विद्यार्थ्यांचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम साडेतीन वर्षाचा झाला आहे.
- शिक्षकांच्या नियुक्तीला दाखवावी लागेल का पाठ?
टीईटी व सीटीईटी परीक्षा देता येणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्याचबरोबर शाळा व कॉलेजमध्ये येणाऱ्या महिन्यात होणाऱ्या नियुक्त्यांनासुद्धा त्यांना पाठ दाखवावी लागणार असल्याची भीती आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता परीक्षेचे आयोजन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.