लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपार कष्ट उपसून आईने वाढविले. आपण चांगल्या पदावर नोकरी करून तिला सुखाचे दिवस दाखवू असे तिचे स्वप्न होते. ते पूर्ण करू शकलो नाही. आई कायमची निघून गेली, हे शल्य त्याला कमालीचे अस्वस्थ करू लागले अन् एका भावी अभियंत्याने आईच्या विरहात गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रोशन सुनील जारोडे (वय २३) असे त्याचे नाव आहे. तो साईनगरात राहत होता. दीड महिन्याचा असताना रोशन आणि त्याच्या आईला वाऱ्यावर सोडून त्याचे वडील निघून गेले. त्याही अवस्थेत न डगमगता मिळेल ते काम करून आईने रोशनला वाढवले. त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी रोशनची आई मेस चालवत होती. भल्या सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कष्ट करत होती. रोशनचे शिक्षण पूर्ण झाल्याने आता तो अभियंता होईल, आपल्याला सुखाचे दिवस येतील, असे स्वप्न ती बघत होती. मात्र, कोरोनाने घात केला. दीड महिन्यापूर्वी कोरोनाने रोशनच्या आईला हिरावून नेले. तेव्हापासून रोशन कमालीचा अस्वस्थ झाला होता. आईच्या विरहाने कासावीस झालेल्या रोशनने रविवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. शिवाजी श्रीराम शेमके (वय ६०) यांनी दिलेल्या सूचनेनंतर एमआयडीसी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी मृतदेह मेडिकलला पाठविला.
तिने कष्ट घेतले अन् निघून गेली
पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता एक सुसाइड नोट आढळली. तिने खूप कष्ट घेतले अन् आता एकटे सोडून निघून गेली. जिवंतपणी आईला सुख देऊ शकलो नाही. तिचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, याची खूप खंत आहे. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे रोशनने सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवल्याचे पोलीस सांगतात. दीड महिन्यापूर्वी आई आणि आता तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.