नागपूर : जी-२० परिषदेनिमित्त छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली. विविध पर्यटनस्थळे, विकासकामे, ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळे, मंदिरे या संकल्पनेवर आधारित ही छायाचित्र स्पर्धा होती. यामध्ये अ गटात विदर्भातील वाघांचे अस्तित्व व विदर्भातील जंगल या विषयावरील फोटो स्पर्धेत नारायण मालू प्रथम, प्रथिश के. द्वितीय, तर आरती फुले यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
ब गटातील नागपूर हेरिटेज या विषयावरील स्पर्धेत रोहित लाडसगावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. क गटात नागपुरातील सण, उत्सव, खानपान व परंपरा या विषयावर निधिका बागडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. ड गटात नागपूर जिल्ह्यातील धार्मिकस्थळे या विषयावर अविनाश चौधरी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
एकूण पाच गटात ही स्पर्धा विभागण्यात आली होती. यात अ गटात विदर्भातील वाघांचे अस्तित्व व विदर्भातील जंगल, ब) नागपूर हेरिटेज, क ) नागपुरातील सण, उत्सव, खानपान व परंपरा, ड) नागपूर जिल्ह्यातील धार्मिकस्थळे आणि इ) नागपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे या गटांमध्ये ही स्पर्धा विभागण्यात आली होती. यापैकी विदर्भातील वाघांचे अस्तित्व आणि विदर्भातील जंगल या विषयावर निवड समितीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन विजेत्यांची निवड केली आहे. तर उर्वरित तीन गटांमध्ये समितीने प्रथम पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रेरणास्थळे या गटात प्रवेशिका प्राप्त झाली नाही.
निवड समितीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, छायाचित्रकार नानू नेवरे, सुदर्शन साखरकर, राकेश वाटेकर यांचा समावेश होता. निवड समितीने छाननीअंती छायाचित्रांची निवड केली. लवकरच मध्यवर्ती संग्रहालयात होणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनात निवडक छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत.