नागपूर : २१ व २२ मार्च रोजी नागपूर शहरात होऊ घातलेल्या जी-२० परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने १० मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली अभिरुप जी-२० परिषद होणार आहे. यात निवड करण्यात आलेले सात विद्यार्थी परिषदेच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या वेशात ‘शाश्वत विकासात नागरी संस्थांची भूमिका’ विषयावर संबोधित करणार आहेत.
जी-२० परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेने अभिरुप जी-२० संकल्पना मांडली आहे. यासाठी जिल्ह्यातील दोन शासकीय, चार ग्रामीण, आठ निमशासकीय आणि सहा खाजगी अशा एकूण २० शाळांची निवड केली आहे. प्रत्येक शाळेचे सात असे एकूण १४० विद्यार्थी या अभिरुप जी-२० मध्ये सहभागी होतील. मंगळवारी जि.प.च्या कै.आबासाहेब खेडकर सभागृहात अभिरुप जी-२० ची रंगीत तालिम पार पडली. येत्या ९ मार्च रोजी पुन्हा अंतिम रंगीत तालिम होणार आहे. १० मार्चला सकाळी १० वाजता याच सभागृहात प्रत्यक्ष अभिरुप जी-२० होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची .माहिती, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविंद्र काटोलकर यांनी दिली.
शालेय स्पर्धांचा पहिला टप्पा पूर्ण
जी-२० परिषद आणि नागरी समुदायाची शाश्वत विकासातील भूमिका या विषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमधून निबंध स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा आणि जी-२० देशांतील वेशभुषास्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचा शालेय स्तरावरील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
१० ते १५ मार्च दरम्यान स्पर्धा
शालेय स्तरावरील दुसऱ्या टप्प्यात शहरी भागात केंद्र स्तरावर आणि ग्रामीण भागात पंचायत समिती स्तरावर स्पर्धा होत आहेत. यातून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम टप्प्यातील जिल्हा स्तरावरील स्पर्धा १० ते १५ मार्च दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना जी-२० परिषदेच्या मुख्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे.