संतप्त नगरसेवकांचा सवाल : पावसाळा आला तरी कामांना सुरुवात नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षांपासून फाईल थांबल्या आहेत. वस्त्यात पावसाळ्यात पाणी साचते. पावसाळा तोंंडावर आला आहे. परंतु प्रभागातील गडर लाईन, चेंबर व पावसाळी नाल्यांची दुरुस्ती झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी ही कामे झाली नाही तर लोकांच्या घरात पाणी शिरल्याशिवाय राहणार नाही. ती कधी दुरुस्त करणार, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी सोमवारी मनपाच्या ऑनलाईन सभेत उपस्थित केला.
दोन वर्षांपासून प्रभागातील कामे प्रलंबित आहे. यामुळे नागरिकांत नाराजी असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणले.
....
झाडे वाचली नाही तर पुढील पिढी माफ करणार नाही
प्रकल्पासाठी अजनी येथील ५ हजार झाडे तोडली जाणार आहे. झाडे वाचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही झाडे वाचली नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. अशी भूमिका हरीश ग्वालबंशी यांनी मांडली. प्रत्येक नगरसेवकांनी १०० झाडे लावली तर १५ हजार झाडे लागतील. असेही ते म्हणाले.
....
आयुक्तांकडून निधीसाठी अडवणूक
मजी स्थायी समिती अध्यक्ष शकलो झलके यांनी त्यांच्या भाषणात आयुक्तांच्या बजेटमध्ये ३५० कोटींची शिल्लक असूनही गेल्या वर्षात विकास कामांसाठी निधी मिळाला नाही. आयुक्तांकडून विकास कामात अडवणूक केली जाते. मी विजय असूनही काही करू शकलो नाही. महापालिकेकडे पैसे असतानाही ते मिळत नसल्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकाश भोयर काही प्रकाश पाडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळात प्रशासनाने इतर कुठेही लक्ष दिले नाही. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने कुठलेही प्रयत्न केला नाही, अशी खंत झलके यांनी व्यक्त केली.
...
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था हवी
अर्थसंकल्पात मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी चांगली तरतूद करण्यात आली आहे. मागील पूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षणाचे होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिले. मात्र पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पाचवीपासूनच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी टॅबची व्यवस्था करण्यात यावी. तशी तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी सूचना शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, नगरसेविका परिणिता फुके, नगरसेवक इब्राहिम तौफिक अहमद यांनी केली.
...
कर वसुली कशी वाढणार?
नागपूर शहरात साडेपाच लाखांवर मालमत्ता आहेत. त्या अनुषंगाने साडेचारशे ते पाचशे कोटी मालमत्ता करायच्या माध्यमातून येणे अपेक्षित आहे. मात्र त्याच्या वसुलीत प्रशासन कमी पडते. हा कर उत्पन्नाचे सर्वोत्तम साधन आहे. त्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी केली. तर नगर रचना विभाग उत्पन्नाचे चांगले माध्यम आहे. चार विभाग एकाच अधिकाऱ्यांकडे आहे. अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे लोकांना कर भरण्यात अडचणी निर्माण होतात. मग मनपाचे उत्पन्न कसे वाढेल, असा सवाल नगरसेवक सतीश होले यांनी उपस्थित केला.
...
आरोग्य सेवेसाठी २५५ कोटीची तरतूद : महापौर
स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी सादर केलेल्या २,७९६ कोटींच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मनपाच्या विशेष सभेमध्ये आठ तासांच्या चर्चेनंतर मंजुरी प्रदान करण्यात आली. सत्तापक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले तर विरोधकांनी हा शब्दाचा खेळ असल्याचा आरोप केला. कोरोनाशी लढा देण्यासाठी २५५.७४ कोटींची तरतूद असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले ही रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या ९.४६ टक्के असल्याचा त्यांनी दावा केला. परंतु यात स्वच्छता विभागाचा कचरा संकलनाचा खर्च समाविष्ट आहे. मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील तिरळेपणाची समस्या लक्षात घेऊन त्यांचे डोळ्यांची नि:शुल्क शस्त्रक्रिया मनपातर्फे करण्यात येईल. त्यांनी ६ नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचेदेखील निर्देश दिलेत.
माजी महापौर नंदा जिचकार, नगरसेविका प्रगती पाटील, संगीता गिऱ्हे प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक संदीप गवई, नरेंद्र बोरकर, माजी महापौर माया इवनाते, धर्मपाल मेश्राम हर्षला साबळे, श्रद्धा पाठक आदींनी चर्चेत सहभाग घेतला.