लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात पाय पसरत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात शासनाचे आदेश धडकले. त्यानुसार नगर पंचायतीने वेळोवेळी साहित्य खरेदी खरेदी करीत लाखाे रुपये खर्च केले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा देखावा उभा केला. दरम्यान, त्या खरेदी केलेल्या साहित्याचे प्रत्यक्ष दर आणि बिलातील दर यात मोठी तफावत असल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली असून, हे गौडबंगाल लाखोंच्या घरात असल्याचे समजते.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जोगेंद्र सरदारे यांनी माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीतून ही बाब समोर येत आहे. नगर पंचायतीने कोविड-१९ अंतर्गत दरपत्रक मागवून सोडियम हायपोक्लोराईड, इन्फ्रारेड थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, मेडिकल हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझर, लिक्विड हॅन्डवॉश बॉटल, ॲटाेमॅटेड हॅन्ड सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन, हॅन्ड सॅनिटायझर पाच लिटर कॅन डिस्पेन्सरसह आदी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या वस्तू खरेदी केल्या. दरम्यान, जोगेंद्र सरदारे यांना माहिती अधिकारात मिळालेली माहिती आणि नगर पंचायतीने खरेदी केलेल्या वस्तूच्या दराची प्रत्यक्ष चाचपणी केली असता, त्यात वस्तूंची किंमत आणि बिलातील दर यात कुठे दुप्पट तर कुठे तिप्पट वाढ असल्याचे आढळते. प्रत्येक वस्तूच्या खरेदी दरात हे गौडबंगाल आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना संसर्गजन्य परिस्थिती कायम असताना संबंधित यंत्रणेतील ‘मोठे मासे’ मात्र शासकीय तिजोरीतील रकमेतून स्वत:चे खिसे भरण्याचा कार्यक्रम करीत होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे साहित्य खरेदीतील या गौडबंगालाची शहरात चांगलीच चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर समोर येत असलेला अपहाराचा हा प्रकार सत्ताधारी पक्षाला भोवण्याची शक्यता आहे.
....
दर फुगले अन् फुगा फुटला
पाच लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे दर ४०० रुपये आहे. त्यासाठी नगर पंचायतीने १५५ रुपये लिटरप्रमाणे १ हजार लिटरसाठी १ लाख ५५ हजार रुपये, इन्फ्रारेड थर्मामीटर १ हजार रुपयात मिळत असताना २,५०० रुपये प्रतिप्रमाणे १० नग खरेदी करण्यात आले. ८०० रुपयाला मिळणारे पल्स ऑक्सिमीटर ३,०२५ रुपयेप्रमाणे १० नग खरेदी करण्यात आले. बाजारभावानुसार ७०० रुपयाला मिळणारी पीपीई किट ९७८ रुपये दराने २५ नग खरेदी केले. ७०० रुपयात मिळणारा मेडिकल हॅन्डग्लोव्होजचा बॉक्स ९४० रुपये दर अशाप्रकारे सर्वच वस्तूचे दर फुगलेले आहे. सरदारे यांनी माहिती अधिकारात माहिती मागताच यंत्रणेतील माशांनी फुगविलेल्या अवाजवी दराचा फुगा फुटला.
....
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या साहित्य खरेदीत अपहार झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. यासंदर्भात तक्रार करीत तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सेनेचे तालुका प्रमुख संदीप निंबार्ते यांनी ही तक्रार केली. यावेळी शिष्टमंडळात सेनेचे शिरीष गुप्ता, विजेंद्र हेडाऊ आदींचा समावेश होता.