लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नितीन गडकरी यांच्या रुपाने मराठी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान व्हावा, त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली.२०१४ च्या निवडणुकीमध्ये बरिएमने भाजपला समर्थन केले. त्यांच्याकडून असलेल्या बऱ्याच अपेक्षा पूर्ण झाल्या असून काही होत आहेत. आंबेडकरी जनतेची कधी नव्हे इतकी कामे गेल्या पाच वर्षात झाली. तथागत गौतम बुद्धांशी संबंधित देशातील महत्त्वाची स्थळे आपसात रस्ता मार्गाने जोडली जात आहेत. बुद्धिस्ट सर्किट तयार केले जात आहे. इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभे राहत आहे. लंडन येथील डॉ. आंबेडकरांचे स्मारक आपल्या ताब्यात घेतले आहे. इतकेच नव्हे तर दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास केला जात आहे. यासोबतच दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोलीचा विकास करून बुद्धिस्ट सर्किट तयार करण्यात येत आहे. ही सर्व कामे पहता या निवडणुकीतही बरिएमं भाजप-शिवसेना युतीला समर्थन जाहीर करीत त्यांच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. नितीन गडकरी यांनी तर देशभरात कामाचा झपाटा लावला आहे. ते गेल्या वेळी ३ लाख मतांनी निवडूनआले होते. यंदा ते पाच लाख मताच्या फरकांनी निवडून येतील. तसेच महाराष्ट्रात भाजप-सेना युतीच्या ४६ जागा येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला नगरसेविका वंदना भगत, अफजल अन्सारी, नंदा गोडघाटे, अशोक नगरारे, भीमराव फुसे आदी उपस्थित होते.नागपूर- विदर्भाचा झपाट्याने विकाससुलेखा कुंभारे म्हणाल्या, आजवर विदर्भात विकास कामे होत नसल्यामुळेच वेगळ्या विदर्भाची मागणी होत होती. परंतु गेल्या पाच वर्षात नागपूर व विदर्भाचा झपाट्याने विकास होत आहे. विशेषत: रस्त्यांच्या जाळ्यांमुळे ग्रामीण भागाचा विकास होत आहे. असे असले तरी वेगळ्या विदर्भ व्हावा, ही आपल्या पक्षाची मागणी कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी पंतप्रधान व्हावेत : सुलेखा कुंभारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:15 PM
नितीन गडकरी यांच्या रुपाने मराठी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान व्हावा, त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली.
ठळक मुद्देभाजप-सेना युतीचा करणार प्रचार