नागपूरः महाराष्ट्र भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी कांचनताई गडकरी यांनी बावनकुळेंचे औक्षण केले. गडकरींनी बावनकुळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
फडणवीस सरकारच्या काळात बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क ही दोन महत्त्वाची खाती होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना भाजपाने कामठी मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांच्या उमेदवारीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले पण श्रेष्ठींनी त्यांचा पत्ता कापला. बावनकुळे यांच्या पत्नीस उमेदवारी द्यावी असा पर्याय तेव्हाच समोर आला, पण श्रेष्ठींनी त्यांनाही उमेदवारी दिली नाही. कामठीत त्यांच्याऐवजी भाजपचे जुने कार्यकर्ते टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली गेली व ते जिंकलेदेखील. तेव्हापासून बावनकुळे बाहेर फेकले गेले पण काहीच महिन्यात त्यांना विधान परिषदेची आमदारकी देवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीसपददेखील त्यांना देण्यात आले.
यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधी नक्की दिली जाईल असे म्हटले जात असताना पुन्हा मंत्रिपदाने हुलकावणी दिली पण आता त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे.