नागपूर : केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या निरीक्षणाच्या दुसऱ्या दिवशी गुजरातमधील भरूच सेक्शनमधील महामार्गाच्या कामाचे निरीक्षण केले.
यादरम्यान फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्वांत गतीने महामार्ग बांधकामाचा जागतिक विक्रम केला गेला. त्या स्थानाची पाहणीही त्यांनी केली.
गुजरातमध्ये ३५,१००0 कोटी रुपयांच्या ४२३ किमी रस्त्याचे निर्माण केले जात आहे. या द्रुतगती महामार्गात ६० मोठे पूल, १७ इंटरचेंज, १७ उड्डाणपूल आणि ८ अन्य उड्डाणपुलांचा समावेश आहे.
गुजरातमध्ये या द्रुतगती महामार्गावर ३३ ठिकाणी रस्त्याला लागून असलेल्या सोयीसुविधा तयार करण्याची योजनाही आखण्यात येत आहे. यामुळे राज्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना जागतिक स्तराच्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच यामुळे रोजगारही मिळेल. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा भारतमाला परियोजनेंतर्गत असून, गुजरातमध्ये सुरू असलेले या महामार्गाचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे वडोदरा-दिल्ली हे अंतर १२० किमीने कमी होणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे विकासाची गंगा गुजरातमध्ये येईल. परिणामी गरिबी, उपासमारी दूर होऊन समृद्धता आणि संपन्नता येईल. उद्योग वाढतील, बेरोजगारांना काम मिळेल, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
याशिवाय नर्मदा नदीवर एक मोठा पूल विशेष तंत्राने बांधण्यात येणार आहे. ३३ महिन्यांत हा पूल पूर्ण होईल. एकूणच गुजरात राज्यात १.२५ लाख कोटींची रस्त्याची कामे सुरू असल्याचेही गडकरी म्हणाले.