कमलेश वानखेडे, नागपूरनागपूर : लोकसभेच्या २०१४ पासून झालेल्या तीनही निवडणुकींचा विचार करता भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पश्चिम नागपूरच्या मतदारांनी आपला खासदार म्हणून पसंती दिली आहे. तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आ. विकास ठाकरे यांना साथ दिली. या लोकसभा निवडणुकीत गडकरी व ठाकरे आमनेसामने आले असता पश्चिमच्या मतदारांनी गडकरींना काहीसे झुकते माप दिले. असे असले तरी गडकरींना जुनी लीड मिळवता आली नाही.
नितीन गडकरी यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरात ३८ हजार ६४३ मतांची आघाडी मिळाली होती. २०१९ मध्येही २७ हजार २५२ मतांची आघाडी मिळाली. यानंतर झालेल्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विकास ठाकरे हे येथून आमदार म्हणून विजयी झाले. गेली साडेचार वर्षे ठाकरे हे आमदार असले तरी त्यांनी मतदारांशी एखाद्या नगरसेवकाप्रमाणे संपर्क ठेवला. स्थानिक प्रश्न सोडविण्यावर भर दिला. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत ठाकरे मागे राहिले. यामुळे आता विधानसभेसाठी भाजपचे हौसले बुलंद झाले आहेत; पण लोकसभेला गडकरींना पसंती दिली असली तरी विधानसभेला ठाकरे यांनाच पसंती मिळेल, असा दावा काँग्रेस कार्यकर्ते करीत असून तसे नसते तर पश्चिममध्ये गडकरींना असलेली २७ हजारांची आघाडी यावेळी साडेसहा हजारांवर आली नसती, असा युक्तिवाद केला जात आहे.
पश्चिम नागपुरात हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिंदी भाषिक मतदारांनी यावेळी गडकरींना एकतर्फी साथ दिली. त्यामुळे ठाकरेंना येथे अपेक्षित आघाडी मिळाली नाही, अशीही चर्चा आहे.