लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीएसई शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला जलद व योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याची गरज आहे, अशा आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना लिहिले आहे.
सीबीएसई स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशन (सिस्वा) च्या अध्यक्ष दीपाली डबली यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार, सिस्वाचे मार्गदर्शक व संस्थापक अॅड. संजय एस. काशीकर, कोषाध्यक्ष महेश डबली व्हीएमएससीचे सचिव प्रमोद रेवतकर यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. सीबीएसईकडून नागपूर शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२० च्या पत्रातून सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सीबीएसई शाळा प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली.
नितीन गडकरी यांनी संघटनेला प्राप्त झालेल्या पीएमओ ऑफिस व मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे मिळालेल्या निर्देशानुसार सीबीएसईचे पत्र व सिस्वाच्या निवेदनाच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना त्वरित सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याबाबत पत्र लिहिले आहे.
आज गडकरींच्या निवासस्थानी बैठक
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील शाळांकडून अतिरिक्त घेण्यात येत असलेली टर्म फी रद्द करणे आणि खासगी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शाळांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत देण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ५ शाळांचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांची बैठक होणार आहे.