लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : गाेसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ तसेच मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारातून जलाशयातील ‘लिकेज वाॅटर’ कुही तालुक्यातील आमनदीत साचून राहत असल्याने अलीकडच्या काळात या नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. या पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा तसेच त्यासाठी तालुक्यात किमान दाेन उपसा सिंचन याेजना मंजूर करून त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वैनगंगा नदीवरील गाेसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील ५४ गावे विस्थापित झाली आहेत. प्रत्येक पावसाळ्यात या जलाशयाच्या ‘बॅक वाॅटर’मुळे वैनगंगा नदीत विलीन हाेणाऱ्या तालुक्यातील सर्व नद्या तुंबतात आणि त्या नद्यांमधील पाणी परिसरात पसरत असल्याने पिकांचे माेठे नुकसान हाेते. यातील आमनदी ही कुही तालुक्यातील प्रमुख नदी असून, या नदीत गाेसेखुर्दचे ‘बॅक वाॅटर’ आणि मकरधाेकडा शिवारातील जलाशयाचे ‘लिकेज वाॅटर’ गाेळा हाेत असल्याने ही नदी वर्षभर तुडूुब भरून असते. मात्र, त्या पाण्याचा सिंचनासाठी काडीचाही उपयाेग हाेत नाही.
आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजनेचे पाणी तालुक्यातील पचखेडीपर्यंत आले आहे. आमनदीवर मांढळ व तारणा येथे उपसा सिंचन याेजना तयार केल्यास मांढळ व तितूर सर्कलमधील शेतीला सिंचनासाठी सहज पाणी उपलब्ध हाेऊ शकते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह ओलिताची रबी पिके घेणे सहज शक्य हाेणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात तसेच शेतमालाच्या उत्पादनात वाढ हाेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही उपसा सिंचन याेजनांना राज्य शासनाने मंजुरी देऊन त्या कार्यान्वित कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कुकडे, लीलाधर धनविजय, अर्चना हरडे, विनोद हरडे, संजय निरगुळकर, संगीता निरगुळकर, तुळसीदास कळंबे, मनोज कावळे, बंडू वैद्य, पांडुरंग मेश्राम, निरंजन नागदेवे, मुरलीधर झोडापे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
...
एकमेव उपसा सिंचन याेजना
कुही तालुक्यातील आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजना ही एकमेव असून, ही याेजना आमनदीवर आहे. या याेजनेमुळे या भागातील २० किमी. परिसरातील शेतीचे सिंचन हाेते. याच नदीवर तारणा आणि मांढळ परिसरात प्रत्येकी एक अशा दाेन उपसा सिंचन याेजनांची निर्मिती केल्यास या दाेन्ही गावाच्या परिसरातील किमान तीन हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित ६० ते ७० किमी परिसरातील सिंचनाची समस्या सुटू शकते.