लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वर-नागपूर मार्गावरील दहेगाव (ता.कळमेश्वर) येथील घरालगतच्या गाेठ्याला शुक्रवारी (दि. २६) दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात गाेठा संपूर्ण तर घर अंशत: जळाले, शिवाय गाेठ्यातील तीन गाईंसह एक वासरूही हाेरपळल्याने जखमी झाले. गाेठ्यातील शेतीपयाेगी साहित्य व सागवान फाटे पूर्णपण जळाल्याने ३ लाख २६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती आग पीडिताचे दिली.
अजाबराव निंबाळकर, रा.दहेगाव, ता.कळमेश्वर यांचा घरालगत गाेठा असून, गाेठ्या जनावरे बांधली हाेती, शिवाय साहित्यही ठेवले हाेते. दुपारी २ वाजताच्या सुमारास गाेठ्यातून माेठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाल्याने, आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच मिळेल त्या साधनाने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीत गाेठ्यात बांधलेल्या तीन गाई आणि एक वासरू हाेरपळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत गाेठ्याबाहेर काढण्यात नागरिकांना यश आले.
आग नियंत्रणात येईपर्यंत संपूण गाेठा, तसेच आत ठेवलेले शेतीपयाेगी साहित्य व अवजारे, ६० नग पीव्हीसी पाइप, फवारणीचे दाेन पंप, इलेक्ट्रिक माेटरपंप व सागवानाचे २५ नग फाट्यांची राख झाली. ही आग पसरत गेल्याने अजाबराव निंबाळकर यांच्या घराचा काेपराही जळाला. या आगीत किमान ३ लाख २६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अजाबराव निंबाळकर यांनी दिली. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या आगीला महावितरण कंपनीचा भाेंगळ कारभार जबाबदार असून, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही दुरुस्तीचे काम केले नाही. त्यामुळे शाॅर्ट सर्किट झाले व गाेठ्याला आग लागली. यात तीन गुरांसह वासरू जखमी झाले असून, आतील संपूर्ण साहित्य जळाले. त्यामुळे या महावितरण कंपनीने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल चाैधरी यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.