रौनक अरुण लोणारकर (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सोमवारी क्वार्टर परिसरात राहतो. रौनक रेमडेसिविर इंजेक्शन विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती खबर्याने पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या पथकाला दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. रौनककडून ४७०० रुपये एमआरपी असलेले रेमडेसिविर इंजेक्शन ३० हजार रुपयात विकत घेण्याची तयारी पोलिसांनी दाखवली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास रौनक त्याच्या दुचाकीने मेयो हॉस्पिटल चौकाजवळ पोहोचला. तेथून काही अंतरावर असलेल्या बाटा शूज शोरूमसमोर त्याने पोलिसांना रेमडेसिविर इंजेक्शन दाखवून रकमेची मागणी करताच त्याला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत हे इंजेक्शन रौनकने त्याच्या आजारी बहिणीसाठी विकत घेतले होते. मात्र, तिला इंजेक्शनची गरज न पडल्यामुळे त्याने आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकण्यासाठी अनेकांना संपर्क केला. त्यामुळेच तो पोलीस कारवाईत अडकल्याचे उघड झाले. तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
रेमडेसिविर काळ्या बाजारात विकणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:08 AM