योगेंद्र शंभरकर
नागपूर : शहरातील कोणत्याही परिसरात सुरू असलेल्या सट्टा-जुगार किंवा अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. २४ जुलै रोजी झालेल्या मासिक गुन्हे बैठकीमध्ये पोलिस आयुक्तांनी छुप्या पद्धतीने सुरू असलेले अवैध धंदे उखडून टाकण्याच्या सक्त सूचना ठाणेदारांना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात गुन्हे थांबविण्याची जबाबदारी असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट चौकीत खुलेआम जुगार खेळल्या जात असल्याचे चित्र दिसून आले.
लाकडीपूल येथील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पोलिस चौकीत हा प्रकार पहायला मिळाला. दुपारी १२ वाजल्यापासून चौकीच्या मागील भागात बांधलेल्या टीन शेडखाली तीन पोलिस कर्मचारी टेबलावर पत्ते खेळू लागले. याची माहिती बाहेरच्या काही लोकांना मिळाली. जुगार व सट्टेबाजीच्या अड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या पोलिस कर्मचाऱ्यांवर असताना तेच नियम धाब्यावर बसवून पोलिस चौकीच्या आतच जुगार कसा खेळत आहेत, या विचारातून त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली. त्यानंतर युनिट-३च्या चौकीत पत्ते खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ बनवण्याचे ठरले. आनंद, फिरोज आणि रवी अशी पत्ते खेळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती मिळाली. शेजारी असलेल्या दुसऱ्या टेबलासमोर बसलेले दोन कर्मचारी मोबाइल बघण्यात व्यस्त होते. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिस आयुक्तांना पाठविला व्हिडीओ
युनिट- ३ च्या लाकडीपूल येथील चौकीत पत्ते खेळत असलेल्या तीन पोलिसांचा कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनाही पाठवण्यात आला. पोलिस आयुक्त आता काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कठोर कारवाई करणार
अशा प्रकारे पोलिस चौकीत बसून पोलिस कर्मचारी जुगार खेळत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाणार आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी स्पष्ट केले.