लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली जागोजागी जुगार अड्डे सुरू आहेत. अनेक तरुणांना नादी लावून लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे चालवणारे आरोपी त्यांची लूट करीत आहेत. लॉकडाऊनमुळे घरी बसून कंटाळलेल्या मंडळीपैकी काही जण विरंगुळ्याचे वेगवेगळे प्रकार शोधून त्यात स्वत:ला गुंतवून घेत आहेत. तर अवैध धंदे करणारी मंडळी त्यांना जुगाराचे व्यसन लावून त्यांची लूट करीत आहेत. उत्तर नागपुरातील एका आरोपीने लुडोच्या नावाखाली ऑनलाईन जुगार चालू केला होता. एकाच वेळी अनेकांना लिंक पाठवून तो हा जुगार इंटरनेटच्या माध्यमातून खेळत होता. दोन महिन्यापूर्वी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. आता ‘काटोल किंग’ नावाने कुख्यात असलेल्या एकाने शहरातील वेगवेगळ्या भागात खासगी ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू केले आहेत. लॉटरीच्या नावाखाली त्याने यशोधरानगर, मेडिकल चौक, महाल आणि पाचपावलीसह अन्य काही भागांमध्ये हा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती आहे. त्यातून अनेकजण या जुगाराच्या नादी लागले आहेत. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अनेक जण लॉटरीवजा जुगार खेळतात आणि आपली आर्थिक लूट करून घेतात.कसिनोही सुरूविशेष म्हणजे, राजेश नामक आरोपीने काही ठिकाणी ऑनलाईन लॉटरीसोबत कसिनोचा जुगारही सुरू केल्याची चर्चा आहे. ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली दररोज हजारो रुपयांची उलाढाल करणारा ‘काटोल किंग’ शासनाचा महसूलही बुडवीत आहे.
नागपुरात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 10:15 PM