नागपूर : पंजाबी लाइनजवळ रेल्वेच्या जमिनीवर खुलेआम जुगार अड्डा सुरू आहे. रेल्वे सुरक्षा दलाने येथे हवालदाराची ड्युटी लावूनही दिवसाढवळ्या हा अड्डा सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने रविवारी आउटरकडील भागात हवालदाराची ड्युटी लावली, परंतु तरीही हा जुगाराचा अड्डा सुरू होता. जेथे हा अड्डा सुरू आहे, तेथे चहा, तसेच चणे विकणारे अवैध व्हेंडर लपून बसतात. याच ठिकाणावरून ते धावत्या रेल्वेगाडीत चढतात. आता येथे मोठ्या संख्येने जुगार खेळण्यासाठी असामाजिक तत्त्व येत आहेत. रेल्वे रुळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर हा प्रकार घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रेल्वेगाड्या आणि प्रवाशांची संख्या कमी आहे. रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी कमी झाली आहे, परंतु रेल्वे परिसरात आउटरकडील भागात अवैध धंदे करणारे, जुगाऱ्यांची, तसेच नशा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. एके काळी दारूची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढली होती. आता दारूची तस्करी आटोक्यात आली आहे. मात्र, जुगार खेळणारे रेल्वेच्या परिसरात येत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
...........