सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर
नागपूर : मनोरुग्णाने स्वत:च्याच हातानेच गळा दाबून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात कमी मनुष्यबळाचे कारण दिले जात असताना, दुसरीकडे चक्क रुग्णालयातच कर्मचारी जुगार खेळत असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. सरकारी अनास्थेच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची ही अवस्था झाली आहे.
मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयांची स्थापना केली. यातील एक नागपुरात आहे. मात्र, वेड्यांकडे काय लक्ष द्यावे, याच जाणिवेतून येथील कामकाज सुरू असल्याने रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. या रुग्णालयात मागील २० दिवसांत जवळपास सात मृत्यू झाले. यातील दोन मृत्यू संशयास्पद स्थितीत होते. रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. रुग्णालय प्रशासन या मागे अटेन्डंटची जवळपास ५४ टक्के पदे रिक्त असल्याचे कारण देत आहे. असे असतानाही रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना वाऱ्यावर टाकून जुगारात व्यस्त राहत असल्याने येथील जबाबदारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
-रुग्णांचा जेवणाच्या शेडखाली रंगतो जुगार
प्राप्त एका व्हिडीओतून मनोरुग्णालयातील वॉर्ड क्र. १५ च्या बाजूला असलेल्या रुग्णांच्या जेवणाच्या शेडखाली सुरक्षा रक्षकांसह अटेन्डंटचा जुगाराचा खेळ रंगत असल्याचे दिसून येते. प्राप्त माहितीनुसार, दुपारी २ वाजतापासून जुगाराला सुरुवात होते. हा जुगार ७ वाजेपर्यंत चालतो. या शेडच्या बाजूला वॉर्ड क्र. १६, तर काही अंतरावर ११ ते १४ क्रमांकाचे वॉर्ड आहेत. जवळच गुन्हेगारांना ठेवण्यात येणारा वॉर्ड क्र. १२ आहे. यामुळे या भागात जबाबदार अधिकाऱ्यांपासून ते डॉक्टर व परिचारिकांची वर्दळ असते. परंतु, गुंड प्रवृत्तीच्या या कर्मचाऱ्यांना कोणीच बोलत नसल्याची माहिती आहे.
-२०१६ मध्ये उघडकीस आला होता हाच प्रकार
‘लोकमत’ने २०१६ मध्ये मनोरुग्णालयात जुगार खेळला जात असल्याचे वृत्त फोटोसह प्रकाशित केले होते. याची दखल घेत दोन डॉक्टरांसह परिचारिकेला नोटीस बजावली होती, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. परंतु, आता पुन्हा तोच प्रकार सुरू झाल्याने कोणावर कारवाई होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-या घटना धक्कादायकच
: १६ नोव्हेंबर रोजी ३८वर्षीय महिला मनोरुग्णाने स्वत:चा गाऊन फाडून, गळ्याभोवती आवळून आत्महत्या केली.
: १७ नोव्हेंबर रोजी ४२ वर्षीय महिलेला मारहाण झाल्याने मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
: २१ नोव्हेंबर रोजी ८५ वर्षीय रुग्णाला ‘बेडसोर’ होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला