अधिष्ठाता गजभिये : मेयोतील लाच प्रकरण नागपूर : लाच मागितली नाही, पैशाला हात लावला नाही. अधिष्ठाता कक्षात आपल्या कामात मग्न असताना औषध पुरवठादार व मेसचे जेवण पुरविणारा विजय मिश्रा हे सोबतच कक्षात आले. मी त्यांना दाद दिली नाही, नंतर ते दोघे कक्षातीलच जेवणाच्या खोलीमध्ये गेले. खोलीच्या पडद्याआड व्यवहार केला. ६ डिसेंबर रोजी बाहेरून कुलूप लावणाऱ्या काही व्यक्तींविरुद्ध ‘अॅट्रॉसिटी’ची तक्रार दाखल केली होती. त्याचा सूड म्हणून ही कारवाई झाली असावी. हे माझ्याविरुद्ध षङ्यंत्र आहे, अशा लेखी माहितीचे पत्र मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये (वाहणे) यांनी मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) पाठविले. मेडिकलच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे बोलले जात आहे. सोमवारी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये लाचेच्या कारवाईला सामोऱ्या गेल्या असता मंगळवारी नेहमीप्रमाणे त्यांनी रुग्णालयाचा राऊंड घेतला. बाह्यरुग्ण विभागापासून ते आकस्मिक विभाग व वॉर्डाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी ‘डीएमईआर’ला हे पत्र दिले. यात त्या म्हणाल्या, अधिष्ठातापदी रुजू होऊन पाचच महिने झाले आहे. अधिवेशनाच्या काळात दरवर्षीप्रमाणे अधिकाऱ्यांसाठी जेवण पुरविण्याची व्यवस्था काही मेडिकल दुकानदाराकडून करण्याची प्रथा आहे. यावर्षी ही व्यवस्था एका वरिष्ठ डॉक्टरने केली होती. याबाबत काहीच माहिती नव्हते. मला जेव्हा याबाबत औषध पुरवठादाराने विचारले तेव्हा तुम्हाला ज्याने कोणी सांगितले त्यांना विचारा, मी मध्ये पडणार नाही व पुढे माझ्याकडे यायचे नाही, असे सांगितले. सोमवारी अधिष्ठाता कक्षात आपल्या कामात मग्न असताना औषध पुरवठादार व मिश्रासोबत आले. औषध पुरवठादाराने पैशाला हात लावून मिश्रा याच्याकडे द्या, म्हणजे आनंद होईल, असे म्हणाला. परंतु त्याला दाद दिली नाही. नंतर ते दोघे २५ फुटावर असलेल्या जेवणाच्या खोलीत जाऊन व्यवहार केला. विशेष म्हणजे, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे तो व्यक्तीही त्यावेळी हजर होता. यामुळे बदनामी व फसविण्याच्या उद्देशाने हे षङ्यंत्र रचण्यात आले, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
हे माझ्याविरुद्ध षङ्यंत्र आहे
By admin | Published: January 18, 2017 2:18 AM