नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारखाना उभारायचा होता. कर्ज मिळणार नव्हते आणि घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे आजीची हत्या केल्यास सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील, असे वाटत होते. त्याचमुळे आजीचा ‘गेम’ करण्याचा कट रचला. तो तर पूर्ण झाला. मात्र, पोलिसांनी पकडल्यामुळे आपला ‘प्लॅन’ फसला, अशी माहितीवजा कबुली विजयाबाई तिवलकर हत्याकांडातील सूत्रधार मिनू हिने आज पोलिसांपुढे दिली.
१५ व्या वर्षीच मिनूला स्वच्छंद जीवन जगण्याच्या कल्पनांनी घेरले होते. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आईवडील रोज पाकीटमनी देत नव्हते. त्यामुळे दीड वर्षापूर्वी मिनूने वाममार्गावर असलेल्या मित्र-मैत्रिणींची संगत धरली. ती त्यांच्याच सोबत राहू लागली. तिच्या वर्तनामुळे आई-वडील तिला हटकू लागले. त्यामुळे तिचे त्यांच्यासोबत खटके उडत होते. या पार्श्वभूमीवर, फेब्रुवारी महिन्यात तिने स्वतःचे घर सोडले आणि ती वेगवेगळ्या मित्रांसोबत राहू लागली. त्यातील १६ वर्षीय जानसोबत मिनूची गट्टी जमली. गर्दुल्यांसोबत राहणारा जान पैशासाठी काहीही करायला तयार होता. ‘कुछ करके दिखायेंगे’, असे या दोघांनी ठरवले होते. दरवाजे-खिडक्या बनविण्याचा कारखाना टाकला तर रोज हजारो रुपयांची कमाई होईल. कारखाना उभारण्यासाठी आठ ते दहा लाख रुपये पाहिजे, असे त्याने सांगितले होते. अल्पवयीन असल्यामुळे बँकेतून कर्ज मिळणार नाही आणि दोघांच्याही आई-वडिलांची आर्थिक अवस्था कमकुवत असल्यामुळे एवढी रक्कम मिळणे शक्यच नसल्याने आजी तिच्या नजरेपुढे. आजीकडे दहा ते पंधरा लाखांची रोकड आणि दागिने असा लाखोंचा ऐवज असेल, असे मिनूला वाटत होते. तो मिळवण्यासाठीच आजीकडे चोरी करायची आणि विरोध केला तर तिची हत्या करायची, असा कुविचार पंधरा दिवसांपूर्वी मिनूच्या डोक्यात आला. आजी ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याने तिच्याकडची रोकड आणि दागिने लुटल्यानंतर आपण दारे-खिडक्या बनविण्याचा कारखाना उभारायचा आणि रोज हजारोत खेळायचे, असा तिचा ‘प्लॅन’ होता. त्यासाठी तिने जान आणि त्याच्या व्यसनाधीन मित्रांच्या मदतीने हे थरारक हत्याकांड घडवून आणले. तिने आजीचा ‘गेम’ तर केला. मात्र मनासारखी रोकड, दागिने तिला मिळाले नाहीत. त्यात आता पोलिसांनीही पकडले. त्यामुळे आपला ‘प्लॅन’ फसल्याची खंत मिनूला वाटत आहे. विशेष म्हणजे, ज्या आजीने मायेने जपले तिची हत्या केल्याची जराही खंत मिनूला वाटत नसल्याचे तपास करणाऱ्या सूत्रांचे सांगणे आहे.
---
मृत पॉझिटिव्ह, आरोपी निगेटिव्ह!
विशेष म्हणजे, मृत विजयाबाईचे शवविच्छेदन करण्यापूर्वी तिची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह आढळली. हत्या करणारे सहाही आरोपी बराच वेळ विजयाबाईच्या आजूबाजूला होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचीही टेस्ट करून घेतली. आश्चर्य म्हणजे, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले आहेत.
---