महाराज बागेत खेळणी तुटलेली : आम्ही खेळायचे कसे? बालकांचा सवालनागपूर : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरातील उद्यानांमध्ये मौजमजा करायला घेऊन जाण्याचा आनंद बच्चेकंपनी पालकांकडे करीत आहेत. मात्र, शहरातील उद्यानांची स्थिती बघता येथे ‘आम्ही खेळायचे कसे’ असा प्रश्न बच्चे कंपनीकडून पालकांना केला जात आहे. महाराज बागेतील खेळण्यांची स्थिती तर जीवघेणी आहे.येथील बहुतांश खेळणी गंजलेली, तुटलेली व मोडकळीस आलेली आहेत. त्यामुळे या खेळण्यांवर मुलांना खेळू देणे धोकादायक झाले आहे. बच्चे कंपनी उत्सुकतेने या खेळण्यांजवळ जातात. पण त्यांची बिकट व धोकादायक अवस्था पाहून पालक लगेच मुलांना आवरतात. त्यामुळे चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. महाराज बाग प्रशासन या उद्यानात प्रवेशासाठी २० रुपये शुल्क आकारते. वाहनांच्या पार्किंगसाठीही शुल्क आकारले जाते. मात्र, त्यानंतरही येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. महाराज बाग बचावसाठी बरेच सामाजिक कार्यकर्ते आवाज उठविताना दिसतात, पण आता खऱ्या अर्थाने महाराज बागमधील या जीवघेण्या खेळण्यांपासून ‘चिमुकले बचाव’ असा आवाज उठविण्याची गरज आहे. महाराज बाग प्रशासनाने वेळीच दखल घेऊन ही खेळणी दुरुस्त करावी, अशी पालकांची मागणी आहे.
मुलांच्या जीवाशी खेळ
By admin | Published: May 30, 2016 2:21 AM