नागपूर : गणेशोत्सवादरम्यान भाविकांची गावोगावी जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचे नियोजन चालविले आहे. त्यानुसार, यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान ३२ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
नागपूर - मडगाव दरम्यान ३२ पैकी काही विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्यात नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या सहा फेऱ्यांचा समावेश असणार आहे. ०११३९ गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन १३, १७ आणि २० सप्टेंबरला नागपूरहून दुपारी ३.०५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता मडगाव (गोवा) येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे ०११४० गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन १४, १८ आणि २१ सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता मडगाव येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.
विशेष म्हणजे, या सर्व विशेष रेल्वेगाड्यांसाठी रिझर्वेशन तिकीटचे बुकिंग रेल्वे प्रशासनाने दीड महिन्यापूर्वीच अर्थात ८ जुलैपासून सर्व आरक्षण केंद्र आणि वेबसाईटवर सुरू करण्याची घोषणा केली होती. याशिवाय प्रवाशांची गर्दी आणखीच वाढली तर काही रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच लावण्याचेही रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.
‘त्या’ गाड्यांमध्ये बदल नाही
या स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त यापूर्वी रेल्वे प्रशासनाने ७४ गणेश फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली होती. तूर्त त्यांची वेळ, थांबे आणि इतर बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
----