लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात काही परिसर हॉटस्पॉट बनले आहेत. त्यातच अनलॉक-४ मध्ये गांधीबाग बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना महामारीसंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन करताना कुणीही दिसत नाहीत. नागरिकांमध्ये गांभीर्य नाही. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पाठपुरावा न केल्यास नागपुरातील सर्वात मोठी गांधीबाग आणि इतवारी बाजारपेठ हॉटस्पॉट बनू शकतात, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.गांधीबाग होलसेल क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान म्हणाले, अनलॉक-४ मध्ये राज्य शासनाने सर्व बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे नागपूर व अन्य जिल्ह्यातील व्यापारी तसेच ग्राहक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. याशिवाय रस्त्याच्या कडेला लागणारे नाश्ताच्या ठेल्यावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. या ठिकाणी ग्राहक कोरोना नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यातच नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने त्यात वाढ होत आहे. हे गंभीर संकेत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.नागपुरात कोरोनाचे नियम केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. नागरिक मास्क वा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. गांधीबाग, इतवारी किराणा बाजार, धान्य बाजार, तेल बाजार या सर्व बाजारपेठांमध्ये दररोज लोकांची गर्दी होत आहे. मनपाचे गांधीबाग झोनल कार्यालय आणि तहसील पोलीस स्थानकांतर्गत गांधीबाग बाजारपेठ येते. पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. गांधीबाग ते इतवारी मार्गावर सराफा चौकापर्यंत लोकांची नेहमीच गर्दी असते. स्टेट बँकेसमोर फळांच्या हातठेल्यावर ग्राहकांची गर्दी असते. याशिवाय धारस्कर गल्लीत लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.ऑड-इव्हन नियमांचे उल्लंघनया बाजारपेठांमध्ये ऑड-इव्हन नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. पूर्वीप्रमाणेच बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने उघडत आहेत. मनपाने कारवाई बंद केल्याने दुकानदारांचे फावत आहे. इतवारी, भंडारा रोड, तीननल चौक, होलसेल क्लॉथ मार्केट, हॅण्डलूम मार्केटमध्ये दुकानदार आॅड-इव्हनचे पालन करताना दिसत नाहीत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता नवीन आयुक्तांच्या कार्यकाळात कारवाया बंद झाल्या आहेत. दुकानदार आणि ग्राहकांच्या मनमानी वागणुकीमुळे या बाजारपेठा हॉटस्पॉट बनण्याच्या धोका निर्माण झाला आहे.
गांधीबाग बाजारपेठ बनू शकते ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 9:21 PM
नागपुरात काही परिसर हॉटस्पॉट बनले आहेत. त्यातच अनलॉक-४ मध्ये गांधीबाग बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना महामारीसंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन करताना कुणीही दिसत नाहीत.
ठळक मुद्देग्राहकांची प्रचंड गर्दी : दुकानदार व ग्राहकांतर्फे नियमांचे उल्लंघन