नागपूर : दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार करूनही समस्या सुटली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नागरिकांसह नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांच्या भेटीसाठी गुरुवारी त्यांच्या कक्षात पोहचले. पण पूर्व सूचना देऊनही अधिकारी उपस्थित नसल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतापले. त्यांनी कक्षातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार केला व लोकांची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना सदबुद्धी येवो, अशी प्रार्थना केली.
दक्षिण नागपुरातील अनेक वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पिण्याचे पाणी व ड्रेनेजचे पाणी याची सरमिसळ होत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या पण त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी झोन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी बुधवारीच सक्करदरा पोलीस ठाण्यात परवानगी मागितली. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शिष्टमंडळ येईल असे नेहरू नगर झोनला कळविले.
यानुसार राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव श्रीकांत शिवनकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष अरविंद भाजीपाले, कार्याध्यक्ष जीवन रामटेके, मेहबूब पठाण, प्रिती शर्मा, सचिन पाटील, रामटेककर, शबाना बेगम, निसार अली यांच्यासह नागरिक सकाळी नेहरूनगर झोनमध्ये धडकले. त्यांनी सोबत दुषित पाणी भरलेलेल्या बाटल्या आणल्या होत्या. मात्र, शिष्टमंडळ पोहचले तेव्हा सहाय्यक आयुक्त उपस्थित नव्हते. त्यांनी इतर अधिकाऱ्यांनाही सूचना दिली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतापले व त्यांनी कक्षातच ठाण मांडले. यानंतर काही वेळांनी दुसरे अधिकारी अधिकारी लिखार तेथे आले त्यांनी म्हणणे ऐकून घेतले.
या भागातील दूषित पाण्याची समस्या येत्या दोन दिवसांत सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.