लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगाच्या इतिहासात महात्मा गांधींनी असाध्य ते साध्य केले. म्हणूनच हिंदू-मुस्लिमांनी त्यांना साथ दिली. त्यांचा धर्म पूजाघरात कधीच नव्हता. मंदिर वा मशिदितही नव्हता; तर जनतेत होता, असे प्रतिपादन नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांंनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने आयोजित युगांतर व्याख्यानमालेचे ‘धर्म आणि महात्मा गांधी’ या विषयावरील अंतीम दहावे पुष्प त्यांनी सोमवारी गुंफले. याप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यानात ते म्हणाले, गांधी स्वत:ला सनातन हिंदू समजत. गिता हा आपला प्राणग्रंथ आहे असे सांगत; एवढेच नाही तर ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ असेही म्हणत असत. खरे तर, एक धर्म कधीच दुसऱ्या धर्माला कधीच बरोबरीचा मानत नाही. पण गांधी ईश्वर आणि अल्ला एकाच वेळी सांगायचे आणि जगही ते मानायचे. सनातनी धर्माला अर्थात मानवतेला अनादी काळ असतो. गांधींच्या सायंप्रार्थनेत सर्वधर्मीयांच्या प्रार्थना होत असत. ते माणूसधर्म सांगायचे. माणसामाणसात फरक करणाऱ्या गोष्टी मान्य नाही, धर्माच्या सीमारेषा पुसट व्हाव्या, असे ते नेहमी म्हणायचे.रसेल म्हणायचे, जगातील सर्व देशांनी एक यावे. पण गांधी म्हणायचे, देशांनी नव्हे तर सर्व माणसांनी एक यावे. तसे झाले तर जगात कोणताच प्रश्न उरणार नाही. कोणत्याही पदावर नसणाऱ्या या माणसामागे संपूर्ण देश चालत गेला. हाती शस्त्र न घेता लढलेल्या या माणसाची समाज हीच शक्ती होती. गांधी हे धर्म आणि माणसांच्या पलिकडचे होते. माणुसकीच्या धर्माची उपासना त्यांनी केली. त्यांची धर्मकल्पना धर्माच्या मर्यादा नाकारून माणसांपर्यंत पोहचणारी होती.प्रतिष्ठानच्या वतीने द्वादशीवार यांचा सत्कारया अंतीम व्याख्यानाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने सुरेश द्वादशीवार यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, कवि यशवंत मनोहर, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. सलग दहा दिवसांच्या व्याख्यानमालेचा पायंडा पाडल्याबद्दल पाहुण्यांनी आयोजकांचे कौतूक केले. द्वादशीवार यांची सध्यास्थितीवरील ही व्याख्याने म्हणजे वैचारिक बिजारोपण असून येणाºया काळासाठी दिशादर्शन असल्याची भावना पाहुण्यांनी व्यक्त केली. संचालन प्रमोद मुनघाटे यानी तर आभार अरूणा सबाने यांनी मानले.