सय्यद मोबीन
नागपूर : दलालांच्या विळख्याने कालपर्यंत चर्चेत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या भिंतीवर महात्मा गांधींची संदेश देणारी तीन माकडं पोहोचली आहेत. एवढेच नव्हे तर या माकडांच्या प्रतिमांच्या शेजारीच एक आरसाही लावण्यात आला आहे. उत्तम नागरिक बना, असा संदेश देण्यासोबतच स्वत:लाही तपासण्यासाठी आरसा बघा, असा संदेशच या निमित्ताने हे कार्यालय देत आहे.
आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. परंतु, ऑनलाइन व्यवहारामुळे ही परिस्थिती बदलली आहे. दलालांचा वावर कमी करण्यासोबतच कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या जुन्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न हे कार्यालय करीत आहे. याच संकल्पनेतून शहर आरटीओ रवींद्र भुयार यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांनी नागरिकांना चांगले व्यक्ती होण्याचा संदेश देणारे पोस्टर कार्यालयात लावले आहेत. या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.
या उपक्रमासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ही माकडं त्यांच्या नियमित संदेशाऐवजी चांगला विचार करा, चांगले पहा व चांगले बोला असे तीन संदेश देत आहेत. लागूनच एक आरसा लावण्यात आला असून, त्याखाली ‘चांगला’ असे लिहिण्यात आले आहे. या आरशात पाहा आणि स्वत:ला तपासा, असा विचार यातून पेरला जात आहे. आरटीओ कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी प्रामाणिकपणे वागावे व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊ नये, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.
विचार चांगले तर सर्वच चांगले
चांगला विचार केला, चांगले पाहिले व चांगले बाेललो तर सर्वकाही चांगले होते. त्यामुळे हा उपक्रम सुरू केला. सर्वांनी या उपक्रमातून प्रेरणा घेऊन स्वत:ला उत्तम नागरिक बनवणे अपेक्षित आहे.
- रवींद्र भुयार, आरटीओ (सिटी)