नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गांधीसागर तलावाचेही अस्तित्व संकटात येत आहे. तलावाचे पाणी प्रदूषणाचा धाेकादायक टप्पा ओलांडत असून येत्या काही वर्षात तेही गटार हाेण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. पर्यावरण संस्था नीरीच्या अहवालातूनही ही स्थिती स्पष्ट हाेत आहे. वस्त्यामधून तलावात दूषित पाणी घेऊन येणारे नाले या प्रदूषणास कारणीभूत ठरले असून त्यावर नियंत्रण मिळविल्याशिवाय गांधीसागत तलाव आपले पूर्ववैभव प्राप्त करू शकणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पर्यावरण कार्यकर्ते शरद पालिवाल यांनी तलावाच्या सर्वेक्षणातून काही महत्त्वाच्या बाबी अधाेरेखित केल्या. आसपासच्या वस्त्यामधून येणारे नाले गांधीसागर तलावात येऊन मिळतात. भालदारपुरा, बजेरिया व जवळच्या वस्त्यामधून नाल्याद्वारे येणारे दूषित पाणी थेट तलावातच साेडले जाते. नाल्याच्या पाण्यामुळे स्वच्छ पाण्याचे स्रोतच उरले नाही. भाेसले काळात हा तलाव बांधला गेला तेव्हा सीताबर्डी टेकडीवरील पाणी वाहत तलावात येत हाेते. कधीकाळी तेलंगखेडी तलावाचे पाणी गांधीसागत हाेत महालमध्ये पाेहचत हाेते. मात्र आता ही गाेष्ट इतिहासजमा झाली आहे. सर्वत्र सिमेंटच्या इमारती उभ्या झाल्या असून शुद्ध पाणी येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. आता तलावात दिसणारे पाणी हे नाल्याद्वारे आलेलेच पाणी हाेय, असा दावा त्यांनी केला. जवळच्या वस्तीमधील जनावर धुतल्यानंतर पाणी तलावातच जाते. इतक्या वर्षापासून मूर्त्यांचे विसर्जन तलावात हाेत असल्याने गाळही वाढला आहे. त्यामुळे तलावातील जैवविविधता नष्ट हाेत आहे.
नीरीच्या अहवालाने चिंता
- सीओडीचे प्रमाण १४ ते १०९ मिलिग्रॅम/लिटर पर्यंत वाढलेले आहे. यावरून प्रदूषण धाेकादायक स्थितीत पाेहचले आहे.
- फाॅस्फरससारख्या घटकाचे प्रमाण वाढले असल्याने शेवाळसारख्या जलवनस्पतींची वाढ हाेत आहे. युट्राेफिकेशन एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे.
- त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी हाेत असून मासे व इतर सजीवांना नुकसान हाेत आहे.
- उच्च प्रमाणात फायटाेप्लॅन्कटन्स वाढीला कारणीभूत घटकांची वाढ.
- राॅटीफर्सच्या अस्तित्वामुळे पाणी अती प्रदूषित असल्याचे संकेत मिळतात. पाणी पिण्यायाेग्य नाहीच पण वापरण्यासह हानीकारक हाेत आहे.
उपाय
- नाल्याचे पाणी तलावात जाऊ न देणे किंवा नियंत्रित करणे.
- एसटीपीसारखी व्यवस्थेद्वारे नाल्याच्या पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतरच तलावात साेडावे.
- पावसाचे पाणी वाहत जाईल, अशा पद्धतीने कॅचमेंट तयार करणे आवश्यक आहे.
- गाळाचा संपूर्ण उपसा करून पाणी शुद्ध हाेण्यास चालना मिळेल.
- तलावात कचरा फेकला जाणार नाही याची काटेकाेर काळजी घेणे, दंडात्मक कारवाईची तरतूद करणे.
- आसपास हाेणाऱ्या अतिक्रमणावर पूर्णपणे प्रतिबंध घालणे.