निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, साैराष्ट्रच्या भागात थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्याने विदर्भालाही गारठवून साेडले आहे. तीन दिवसापासून तापमान घसरण्याचे सत्र सुरू असून बुधवारी त्यात माेठी घसरण झाली. विदर्भात गाेंदियामध्ये सर्वात कमी ९.४ अंश, तर नागपूर व वर्ध्यात १० अंश तापमानाची नाेंद झाली, जी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निचांकी नाेंद आहे. त्यामुळे नागरिकांना जबरदस्त थंडीचा सामना करावा लागत आहे.
डिसेंबरचा पहिला संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरणामुळे थंडीविनाच गेला. दुसऱ्या आठवड्यात मात्र थंडीने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्या तिनच दिवसात तापमान ८ ते १० अंशाने खाली घसरले. नागपूरला रविवारी १९.४ अंशावर असलेला पारा साेमवारी १६ अंश, मंगळवारी ४ अंशाने घसरून १२ अंशावर आणि बुधवारी पुन्हा २ अंशाची घसरण हाेत १० अंशावर आला. गाेंदिया व वर्ध्यात याच फरकाने किमान तापमानात घसरण झाली. गडचिराेलीतही १०.४ अंश तापमानाची नाेंद झाली आहे. भंडारा ११.४, ब्रम्हपुरी ११.१ आणि चंद्रपूरला पारा १२ अंशावर आला आहे.
किमान तापमानात अशाप्रकारे घसरण झाल्याने थंडीचा तडाखा बसला आहे. रात्री व पहाटेच्या वेळी प्रचंड हुडहुडी भरत असून घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. सूर्यकिरणे जमिनीवर पाेहचेपर्यंत बाहेर पडायला पाय धजावत नाही. दिवसाचे तापमानही सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने कमी असल्याने दिवसासुद्धा गारव्याची जाणीव हाेत राहते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंडीचा हा प्रकाेप पुढचे १० दिवस म्हणजे २० डिसेंबरपर्यंत जाणवत राहणार आहे. या काळाता तापमान स्थिर किंवा आणखी घसरण्याची शक्यता आहे.