लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखादी मोठी जबाबदारी आली की घरातील दैनंदिन कार्य, सणसोहळे याकडे लक्ष देण्यासाठी राजकारण्यांना फारसा वेळ मिळत नाही. अनेकदा तर कुटुंबियांनादेखील भेटण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मात्र याला अपवाद आहेत. तीन महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी असतानादेखील आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना ते दिसून येतात. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील त्यांच्या रामनगर येथील ‘भक्ती’ या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गडकरी यांच्यातील आजोबांचेदेखील दर्शन झाले. आपल्या नातवंडांना गणेशोत्सवाचे महत्त्व, परंपरा याबाबत लहानसहान माहिती देत होते.दरवर्षी गणेशोत्सवाला घरी राहण्याचा गडकरी यांचा प्रयत्न असतो. कुटुंबाची परंपरा जपली गेली पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. गुरुवारी गणेशमूर्ती आणण्यासाठी गडकरी स्वत: मुले व नातवंडांसह गेले होते. त्यांचा धाकटा मुलगा सारंग याच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना झाली. यावेळी पत्नी कांचन, मोठा मुलगा निखील, सुना, नातवंडे सर्वच उत्साहात दिसून येत होते. विशेष म्हणजे गडकरी यांनी घरातील सर्वसामान्य कर्त्या पुरुषाप्रमाणे यावेळी प्रत्येक लहानसहान गोष्टींकडे आवर्जून लक्ष ठेवले. घरी आलेल्या सर्वांची ते अगत्याने विचारपूस करत होते.समाज ज्ञानमार्गाकडे जावा हीच प्रार्थनागणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. गणराय विद्येचे दैवत आहेत. विद्या व ज्ञान यांच्या माध्यमातूनच अंधारातून विकासरुपी प्रकाशाकडे जाणे शक्य आहे. समाजात ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांची वाढ व्हावी व समाज ज्ञानमार्गाकडे जावा हीच प्रार्थना आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समृद्ध जीवन मिळो, अशी भावना यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.